बारामती येथील पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

बारामती येथील पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

 

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्या दि. ६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

२८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदासह राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांनी सांभाळली आहे. अजितदादांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार या आपला उमेदवारी अर्ज दि. ६ एप्रिल रोजी दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अनेक मंत्री व नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अजितदादांच्या निधनानंतर होत असलेली बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपण बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केलेली भूमिका मान्य नसल्याचं सांगत कॉँग्रेसकडूनही उमेदवार दिला जाईल असं कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं बारामतीच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत माहिती देत ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. वेळ पडल्यास कॉँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटून चर्चा करू असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं कॉँग्रेसकडून उमेदवार देण्याचा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो. मात्र लक्ष्मण हाके हे काय भूमिका घेतात यावर या पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.