नरहरी झिरवाळ प्रकरणाला वेगळं वळण! तृतीयपंथीयाकडून भावाविरोधातच गुन्हा दाखल, त्यानेच व्हिडिओ बनवला; कारणही सांगितलं
बुधवार, १ एप्रिल, २०२६
Edit
मुंबई: शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ वादात सापडले आहेत. शासकीय निवासस्थानाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करत त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मात्र या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला असून व्हिडिओत मंत्री झिरवाळ यांच्यासोबत दिसणाऱ्या व्यक्तीने पोलिसात धाव घेत आपल्या भावाविरोधात तक्रार दिली आहे. तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीनंतर त्याच्या भावाविरुद्ध कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या
माहितीनुसार, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल
झाल्यानंतर तृतीयपंथीयाने पोलिसात धाव घेत आपल्या भावाने आधी ब्लॅकमेलिंग
करत नंतर व्हिडिओमध्ये छेडछाड करत तो व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. सदर
व्हिडिओ मूळ स्वरुपातील नसून तो नंतर एडिट करत त्यामध्ये छेडछाड करण्यात
आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे एखाद्याच्या गोपनीयतेचा भंग
करणे, बदनामीकारक मजकूर पसरवणे व धमकावणे या प्रकरणी भारतीय न्याय
संहितेच्या कलम ७९ व ३५१(१) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झिरवाळांनी काय दावा केला होता?
राज्याचे
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्हायरल व्हिडीओसंदर्भात
फोनवरुन संपर्क साधून माहिती दिली आहे. त्यानंतर मी त्यांना सदर
व्हिडीओबाबत पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे, असं राज्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. झिरवाळ
यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाल्यानंतर
झिरवाळांवर कारवाई करणार का, असा प्रश्न शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस
यांना विचारण्यात आला होता. त्यावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर
मंत्री झिरवाळ यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहितीही फडणवीस
यांनी दिली. जो व्हिडिओ व्हायरल होतोय, तो तीन-चार व्हिडिओ जोडून चुकीच्या
पद्धतीने तयार केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,
अशी मागणी नरहरी झिरवाळ यांनी आपल्याकडे केल्याचं मुखअयमंत्री म्हणाले
होते.