राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली महायुती सत्तेत खाते बदल होण्याची चर्चा
मंत्री आदिती तटकरे यांना यावर प्रतिक्रिया देताना, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील, असे म्हटले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, "अर्थखात्याच्या बदल्यात, अजित पवार राष्ट्रवादीला महसूल खाते मिळणार असल्याचे हे मी पहिल्यादांच ऐकत आहे. अजितदादांच्या निधनानंतर, त्यांच्या पश्चात लगेचच अर्थसंकल्पीय अधिवेशन होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सर्व नेत्यांशी चर्चा करून, अर्थ खाते स्वतःकडे घेत, अर्थसंकल्प सादर केला."
'अर्थ अन् महसूल खाते बदलाची चर्चा असेल, तर याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. महायुतीमध्ये अर्थ खात अजित पवार यांच्याकडे होते, या खात्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना होता. आज सुनेत्रावाहिनी आहेत, त्यांच्यावर अधिकच्या महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी दिली, तर आनंद होईल,' असेही आदिती तटकरे यांनी म्हटले.
अजितदादाच्या पश्चात सुनेत्रावहिनींनी पक्षाची जबाबदारी संभाळली आहे. पार्थ आणि जयदादा हे पक्षाचे संघटन त्यांच्यापद्धतीने संभाळत आहेत. त्यांनी ज्या जबाबदाऱ्या घेतल्यात, मला खात्री आहे की ते अजितदादाच्या कामाची पद्धत अवलंबून पक्ष अधिक त्याच्या मार्गदर्शनाखाली मजबूत करतील, असेही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रावहिनी मुख्यमंत्री होतील का? यावर, आम्हाला खात्री आहे की, सुनेत्रावाहिनी सर्वाधिक मतांनी निवडून येतील. सुनेत्रावाहिनी या निवडणुकीला सामोरे गेल्या, पवारसाहेबांनी ही त्याच्या पक्षाचा उमेदवार दिला नाही, काँग्रेसने ही नंतर उमेदवार मागे घेतला. अनेकांनी पाठिंबा दिला. त्या सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असे आदिती तटकरे यांनी विश्वास व्यक्त केला.
एक कार्यकर्ता म्हणून आपल्या नेत्याला, सर्वोच्च पदावर काम करताना पाहण्याची इच्छा असते. मनातील तळमळ असते. ते मी तिथं मांडली आहे. कुठं ना कुठ, तरी वाटतं की, अजितदादाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न, म्हणजे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न, सुनेत्रावहिनींच्या माध्यमातून पूर्ण व्हावं. मी कार्यकर्ता म्हणून भावना मांडल्या याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही आदिती तटकरे यांनी म्हटलं.