"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्युबद्दल आमदार रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. यासंदर्भात रोहित पवारांनी दिल्लीत आणि राज्यातील नेत्यांच्याही भेटी घेतल्या आहेत. आता डीजीसीएच्या एका बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी एक पोस्ट केली आहे.
डीजीसीएमध्ये भ्रष्ट अधिकारी, हे सिद्ध झाले
एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, "डीजीसीए"च्या (नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय) विभागाच्या उप संचालकाला सीबीआयने अटक केली असून, गुन्हा दाखल झाला आहे. डीजीसीएमध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी असल्याचे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत, हे यामुळे सिद्ध झाले आहे. अटक झालेला तर छोटा मासा आहे, याहून मोठमोठे मासे या यंत्रणेत आहेत."
अपघाताची कागदपत्रे नष्ट केली?
"लाच देऊन डीजीसीएमध्ये कामे होत असतील, तर लाच देण्यात व दलाली करण्यात पटाईत असलेला व्ही.के. सिंग याने कशा प्रकारे दादांच्या (अजित पवार) अपघातसंदर्भातील कागदपत्रे नष्ट केले असतील याचा अंदाज येतो", असा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे.
टीडीपीची भूमिका, केंद्राचा दबाव? रोहित पवार म्हणाले...
रोहित पवारांनी पुढे म्हटले आहे की, "एकीकडे दादांच्या (अजित पवार) अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची विनंती करून दोन महिने उलटले तरी सीबीआयने तपास हातात घेतला नाही; परंतु दुसरीकडे सीबीआय स्वतःहून ऍक्शन घेते हे विशेष म्हणावे लागेल."
"कदाचित टीडीपीच्या मंत्रालयाला इशारा किंवा अप्रत्यक्ष मेसेज दिला असावा म्हणूनच प्रादेशिक अस्मिता बाजूला सारून टीडीपीकडून डिलिमिटेशन (मतदारसंघ फेररचना) संदर्भात केंद्र सरकारच्या आदेशांचे तंतोतंत पालन केले जात असावे", अशी शंका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.