"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
"मी पार्थला म्हणाले, काही बोलू नको, नीट चेक कर"
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, "मी त्याला बोलले की, डॅडी त्या प्लेनमध्ये आहेत, कशावरून? काही तरी बोलू नको. नीट चेक कर. एका मोबाईलवरून तो माझ्याशी बोलत होता आणि दुसऱ्या मोबाईलवरून तो मुसळेंशी बोलत होता. मुसळे, किरण गुजर हे तिथे (अपघाताच्या ठिकाणी) होते. ते पार्थला व्हिडीओ कॉल करून घटनास्थळाचा व्हिडीओ दाखवत होते", असा प्रसंग सुप्रिया सुळेंनी सभेत सांगितला.
"आजही डोळे बंद केले की वाटतं काय तो दिवस होता, काय ती परीक्षा, काय झालं की असा दिवस आपल्यावर आला. आजही माझा विश्वास बसत नाही. ते प्लेन बघण्याची हिंमत मी पण केली नाही. त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो. पार्थ म्हणाला, ते विमान बघायचं, माझी आणि वहिनींची हिंमतच झाली नाही", असे सांगताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या.
'बारामतीकरांनी एकमेकांना शब्द दिला पाहिजे'
"मला अपेक्षा होती की, कदाचित अजितदादा त्या विमानामध्ये नसेलच. असला तरीही अजितदादा त्यातून बाहेर येईल. आपण कशाला वाईट विचार करायचा. पण, झालं ते झालं. आपण एक शब्द बारामतीकरांनी एकमेकांना दिला पाहिजे की, अजितदादांची जी स्वप्ने आहेत, आपण सगळे एकत्र मिळून पूर्ण करूयात", अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या.
"मी वहिनींना शब्द देते"
"मी स्वतः महाविकास आघाडीच्या वतीने सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, संजय राऊत, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि माझे सगळे सहकारी यांच्यावतीने वहिनींना शब्द देते की, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता, मतदार ताकदीने त्यांच्यासोबत उभे राहतील", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.