बारामती येथील अकॅडमी चालकाने पोलीस उपनिरीक्षकालाच मागितली खंडणी

बारामती येथील अकॅडमी चालकाने पोलीस उपनिरीक्षकालाच मागितली खंडणी

 

बारामती : बारामती शहरात पुन्हा एकदा अकॅडमी चालकांच्या गैरप्रकाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका अकॅडमी चालक दाम्पत्याने पोलीस उपनिरीक्षकाला जाळ्यात ओढत खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रशांत सरतापे व त्यांच्या पत्नीविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार यांना संबंधित अकॅडमीमध्ये व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या ओळखीचा गैरफायदा घेत अकॅडमी चालक महिलेने त्यांच्याशी संपर्क वाढवला. चर्चेच्या निमित्ताने विश्वास संपादन करत संबंधित अधिकाऱ्याला जाळ्यात ओढण्याचा कट रचण्यात आला.

यानंतर आरोपी दाम्पत्याने कुंभार यांना धमकावत, “जर खंडणी दिली नाही तर खोट्या ॲट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करू,” अशी भीती दाखवली. या दबावाखाली अमरनाथ कुंभार यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. तसेच आणखी दहा लाख रुपये न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी अमरनाथ कुंभार यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही बारामतीत एका अकॅडमी चालकाचा गंभीर प्रकार समोर आला होता. संबंधित प्रकरणात एका मुलीला नशेचे औषध देऊन तिचे शोषण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या घटनेची धूळही बसलेली नसताना आता पुन्हा अशाच प्रकारचा खंडणीखोरीचा प्रकार समोर आल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामतीत वाढत्या अशा गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.