शिरूरमध्ये मातृत्वाला काळिमा; दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या ११ महिन्याच्या मुलाचा निर्घृण खून
शिरूर : भांबर्डे (ता. शिरूर) येथे ११ महिन्याच्या मुलाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पूजा रवींद्र पवार (वय २२) यांना शिरूर न्यायालयाने शुक्रवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सतत किरकिर करीत असलेले बाळ दुसरे लग्न करण्यासाठी अडथळा ठरत असल्याने त्याचा खून केल्याची कबूली पूजा यांनी दिली असल्याची माहिती शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दुसऱ्या लग्नामध्ये अडथळा ठरणाऱ्या बाळाचा खून करणाऱ्या महिलेचे श्रीगोंदे येथील तरूणाशी पहिलेही एक लग्न झाले होते, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आल्याने या धक्कादायक घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
यश रवींद्र पवार असे खून झालेल्या मुलाचे नाव असून, आठ मार्च ला पूजा हिने कपडे धुण्याच्या सिमेंट ओट्यावर आपटून त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कपड्याच्या बॅगमध्ये भरून, दगड टाकून ही बॅग पवार वस्ती (भांबर्डे) येथील आपल्याच शेतातील विहिरीत टाकून ती फरार झाली होती. दरम्यान, रवींद्र पवार यांनी संपर्क साधला असता मुलगा माझ्यासमवेत सुखरूप असल्याचे तीने सांगितले. त्याचदरम्यान, पारनेर येथील एका तरूणाशी लग्न केल्याबाबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पाहिल्यानंतर रवींद्र यांनी तीच्याशी वारंवार संपर्क साधून तुला काय करायचे ते कर, पण माझ्या मुलाला आणून दे, असा तगादा लावला.
यावर पूजा टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देऊन लागल्याने रवींद्र यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या दरम्यान, जांबूत परिसरात पूजा यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी यश च्या खूनाची कबूली दिली असल्याची माहिती ढोले यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके अधिक तपास करीत आहेत.