एसटीतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
मुंबई: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या तिकीट दरामध्ये १५ एप्रिलपासून १० टक्के हंगामी वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे. यानंतर आता एसटी महामंडळाने प्रत्येक तिकिटावर ‘स्वच्छता अधिभार’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटी लालपरीचा प्रवास आणखी महागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची राज्यभरात २५१ आगारे व ५९८ बसस्थानके आहेत. तसेच महामंडळाच्या बसमधून दैनंदिन सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. प्रवाशांची वाहतूक करताना त्यांना स्वच्छ बस उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर स्वच्छ बसस्थानक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एसटी महामंडळाच्या प्रवास भाड्यात प्रति प्रवासी २ रुपये स्वच्छता अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ एप्रिल २०२६ पासून प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार
या निर्णयानुसार १५ एप्रिल २०२६ पासून प्रवासी भाड्यात स्वच्छता अधिभाराची आकारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तिकिटावर २ रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. बस स्थानके, बसेस व कार्यालयांची दररोज स्वच्छता करण्यात येणार आहे. लवकरच बस स्थानकांवरील सर्व स्वच्छतालये प्रवाशांसाठी मोफत केली जाणार आहेत. तसेच दैनंदिन स्वच्छतेचा संपूर्ण खर्च एसटी महामंडळ स्वतः उचलणार असल्याचे सांगितले जात आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार आकारणी करून स्वच्छता अधिभारापोटी प्राप्त होणाऱ्या निधीतून प्रवाशांना व एसटी कर्मचाऱ्यांना अधिक दर्जेदार स्वच्छताविषयक सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्वच्छ असणाऱ्या एसटीकडे प्रवासी वर्ग अधिक वळेल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, विशेष बससेवेअंतर्गत देण्यात येणाऱ्या बससाठी प्रति दिन प्रति बस ५० रुपये आकारले जाणार आहेत. आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेअंतर्गत पासधारक प्रवासी ५ रुपये आकारले जातील. महिला सन्मान योजना व ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षावरील व ७५ वर्षा पर्यंतचे ज्येष्ठ नागरिक), अमृत ज्येष्ठ नागरिक, अन्य सर्व सवलतधारी प्रवाशांकडून दोन रुपये आकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अधिभारापोटी कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांबाबत मासिक पास, अहिल्याबाई होळकर विद्यार्थीनी पास, मानवविकास, सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना घरी जाणे यासाठी अधिभार आकारला जाणार नाही. सद्यस्थितीत सर्व आगारात ईटीआय मशीनद्वारे तिकीट विक्री करण्यात येत आहे. ईटीआय मशीनमध्ये असलेल्या टप्पा व दरपत्रकामध्ये स्वच्छता अधिभाराचा समावेश ईबिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याद्वारे आवश्यक ते तांत्रिक बदल केले जातील.