‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला फडणवीसांनी दिले नवीन नाव
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव मार्गिकेला ‘मिसिंग लिंक’ म्हटले गेले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या मार्गाची निर्मिती केली. या मार्गिकेमुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहेत. एमएसआरडीसी आणि त्यांच्या अभियंत्यांनी उत्तम काम करत हा मार्ग उभारला, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?
हा महामार्ग कसा उभारला गेला, यामागचा घटनाक्रम सांगताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ‘मिसिंग लिंक’ मार्गिकेला नवीन नाव दिले. १३ किमींच्या या नव्या मार्गिकेला ‘मिसिंग लिंक’ म्हटले जात होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गिकेला ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणावे, असे आवाहन केले. तसेच कनेक्टिंग मार्गिकेची माहिती देताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर टीकाही केली. या मार्गाची कल्पना पहिल्यांदा २०१० साली मांडली गेली. त्यानंतर अन्वेषण होऊन त्याचा अहवाल तयार झाला. मात्र हा मार्ग कसा होऊ शकत नाही, यासाठी आधीच्या सरकारने १३ कारणे दिली. परंतु, महायुती सरकारने पाठपुरावा केला, आव्हानांवर मात केली आणि कनेक्टिंग लिंक प्रकल्प पूर्ण केला. यामध्ये जगातील विविध ७ देशांचे सहकार्य लाभले. विविध कामांसाठी या ७ देशांनी योगदान दिले, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, या मार्गामुळे जागतिक विक्रम प्रस्थापित झाला आहे. जगातील सर्वात उंच केबलस्टेड पूल इथे तयार केला असून त्याची उंची १८२ मीटर आहे. नदीवर उभारलेला हा पूल अभियांत्रिकी चमत्कार आहे. यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. तसेच लोकांचा वेळही वाचणार आहे.