“ही एक राष्ट्र शक्ती...”; अण्णा हजारेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा, शासनाला मोठा सल्ला
कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांसाठी एक आनंदाचे वृत्त आहे. आम्ही इन्स्टाग्रामवर परत आलो आहोत. आम्ही आमचे खाते परत मिळवले आहे, अशी माहिती 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी काही वेळापूर्वीच एका एक्स पोस्टमधून दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतात 'सीजेपी'चे अधिकृत एक्स खाते ब्लॉक करण्यात आले होते. एकीकडे देशात कॉक्रोच जनता पार्टीवरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना पत्रकारांनी अण्णा हजारे यांना कॉक्रोच जनता पार्टीबाबत प्रतिक्रिया विचारली.
युवा शक्ती ही एक राष्ट्र शक्ती आहे
अण्णा हजारे यांनी सांगितले की, झुरळ असे जरी नाव असले, तरी तरुण त्या पार्टीच्या पाठीशी उभे राहिले. मग हे समजून घेतले पाहिजे की, झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता. झुरळ हे नाव जरी योग्य वाटत नसेल, तरी मोठ्या प्रमाणात देशातील तरुणाई त्या पार्टीला समर्थन देत आहे, हे महत्त्वाचे आहे. युवा शक्ती ही एक राष्ट्र शक्ती आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शासनाने त्यांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, "कॉक्रोच जनता पार्टी" हा आभासी पक्ष स्थापन करून चर्चेत आलेले अभिजीत दीपके यांना धमक्या आल्याने छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सिडको वाळूज महानगर-१ येथील त्यांच्या आई-वडिलांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, दोन अधिकाऱ्यांसह २२ पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून लक्ष ठेवले जात आहे.