"मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
"नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो, त्यांनी परिस्थिती समजून घेतली. आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते" अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. "मी काल स्वत: पीडितेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं, याकरता माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत."
"नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे"
"लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावलं जाईल. तसं लेखी पत्र आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलं आहे. ही घटना गंभीर आहे, रोष साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही चुकीचं नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
"मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो"
"काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो, त्यांनी परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. ते लोक कोण आहेत, हे लक्षात आले आहे. मात्र मुलीच्या वडिलांनी जी काही भूमिका घेतली, त्यासाठी मी आभारी आहे. कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आम्ही आरोपीवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही माहिती घेत आहोत. मात्र या गुन्ह्यातून तो बाहेर येऊच शकत नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.