५ किलो गॅस सिलेंडरचे भाव भडकले! घरगुती सिलेंडर पेक्षाही तिप्पट महाग

५ किलो गॅस सिलेंडरचे भाव भडकले! घरगुती सिलेंडर पेक्षाही तिप्पट महाग

 

इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या तणावाचे एलपीजी संकट आता सर्वसामान्यांच्या खिशावर येऊन पोहचले आहे. अनेक दावे करूनही, सरकारी तेल कंपन्यांना हे संकट आता लपवता येत नाहीये. यामुळेच, शुक्रवारी 1 मे 2026 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 1,000 रुपयांची वाढ करण्यात आली. आता या वाढीचा फटका केवळ हॉटेल व्यावसायिकांनाच नाही तर सर्वसामान्य 5 किलोचा छोटू सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना देखील बसणार आहे.

किती वाढ?

नवीन निर्णयानुसार आता 5 किलो छोटू सिलिंडरच्या दरात तब्बल 261 रुपयांची वाढ झाली आहे. ही थोडी वाढ नसून आता या छोटू सिलिंडरची किंमत स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरपेक्षा केवळ 31 रुपयांनी कमी आहे. तसेच गॅस नंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची वेळ आली आहे असेही म्हटले जात आहे.

कुणाला फटका?

मार्च महिन्यात एलपीजी संकटाचा परिणाम कमी करण्यासाठी सरकारने छोटू सिलिंडर सहज उपलब्ध करून दिले होते. त्याचा वापर प्रामुख्याने मजूर आणि विद्यार्थी करतात. मात्र आता यात वाढ झाल्याने शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि कामगारांवर याचा गंभीर परिणाम होणार आहे. 5 किलोच्या सिलिंडरच्या दरवाढीचा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय, रिअल इस्टेट क्षेत्रातील बांधकाम कामगारांना आता अडचणींचा सामना करावा लागेल.

छोटू सिलिंडरची किंमत किती?

कालच्या निर्णयानंतर आता 5 किलो छोटू सिलिंडरच्या किमतीत तब्बल 261 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुणे शहरात 30 एप्रिलपर्यंत 549 रुपये किंमत असणारा हा सिलिंडर आता तब्बल 810 रुपयांना मिळत आहे. दरम्यान घरगुती वापरासाठी वापरला जाणार 14.2 किलोग्रामचा घरगुती LPG सिलेंडर 913 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आता 5 किलोग्राम सिलेंडर आणि 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडर यांच्या किमतीत फक्त 100 रुपयांचा फरक आहे.

छोटू सिलेंडर घरगुती गॅसपेक्षा तिप्पट महाग

14.2 किलोग्रामचा घरगुती सिलेंडर आणि 5 किलो छोटू सिलिंडरच्या किमतींची तुलना केल्यास, तुमच्या लक्षात येईल की 5 किलो छोटू सिलिंडर तिप्पट महाग झाला आहे.

5 किलो छोटू सिलिंडरची प्रति किलोग्राम किंमत सुमारे 162 रुपये आहे तर घरगुती गॅस प्रति किलोग्राम सुमारे 62 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे तसे बघितले तर छोटू जवळपास तिप्पट महाग झाला आहे.