सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांचा राजीनामा; उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी!
बारामती: बारामती तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्राचे केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या नेतृत्वाच्या चर्चांना उधाण आले आहे.
पुढील काही महिन्यांत कारखान्याची निवडणूक होणार असल्याने आता उपाध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सोमेश्वर कारखान्याच्या राजकारणाला नेहमीच बारामतीच्या राजकीय समीकरणांचे प्रतिबिंब मानले जाते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर एकहाती सत्ता स्थापन झाली होती. विशेष म्हणजे विरोधी गटांनाही एकत्र घेत अजितदादांनी व्यापक राजकीय एकजूट उभी केली आणि भाजप प्रणीत पॅनलचा मोठ्या फरकाने पराभव करत सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व अधोरेखित केले होते.
त्या विजयानंतर सत्तेच्या समतोल वाटपासाठी एक वेगळी रणनीती आखण्यात आली. चेअरमनपदी पुरुषोत्तम जगताप यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपद दरवर्षी वेगवेगळ्या संचालकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार आतापर्यंत आनंदकुमार होळकर, प्रणिता खोमणे, बाळासाहेब कामथे आणि मिलिंद कांबळे यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या निर्णयामुळे कारखान्यातील विविध गटांना प्रतिनिधित्व मिळाले तसेच अंतर्गत समन्वय राखण्यासही मदत झाली.
मिलिंद कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर आता नव्या चेहऱ्याची निवड कोणाच्या नावावर होते याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी होणारी ही निवड केवळ औपचारिक राहणार नसून पुढील राजकीय दिशा आणि गटबांधणी ठरवणारी मानली जात आहे. त्यामुळे इच्छुक संचालकांकडून पडद्यामागील हालचालींनाही वेग आला आहे.
सध्या कारखान्यातील महत्त्वाच्या निर्णयांचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाकडे असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अंतिम
निर्णय त्यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार असल्याची चर्चा सहकार आणि
राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोणत्या गटाला संधी मिळते कोणत्या चेहऱ्यावर
विश्वास दाखवला जातो आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कोणते राजकीय संदेश
दिले जातात यावर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
दरम्यान सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे तालुक्यातील सहकार राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. उपाध्यक्षपदाच्या या बदलातून आगामी निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाल्याची चर्चा आता उघडपणे होताना दिसत आहे.