“त्याला जिवंत जाळा”, नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचा संताप
नसरापूर: वर्षभरापूर्वी अंबरनाथमध्ये एका ४ वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. या घटनेवरून सर्वच स्तरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आता अशीच एक धक्कादायक घटना पुण्याजवळच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये घडली आहे. एका ६५ वर्षांच्या नराधमानं साडेतीन वर्षांच्या एका चिमुकलीवर पाशवी बलात्कार केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. या घटनेमुळे पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली असून आपल्या चिमुकल्यांच्या सुरक्षेसोबतच अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी पुढे येत आहे. या प्रकरणी आता या आरोपीची पत्नी व मुलाने संतप्त प्रतिक्रिया देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
त्याला तसाच ठेचून मारला पाहिजे – आरोपीची पत्नी
नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीच्या वृद्ध पत्नीने एबीपीशी बोलताना या घटनेवर व आपल्या पतीवर संताप व्यक्त केला आहे. गेल्या १० वर्षांपासून आपला त्याच्याशी संपर्क नसल्याचंदेखील त्यांनी नमूद केलं. “त्या बाळाची हत्या झाली त्याच ठिकाणी त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे. मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. माझ्यापर्यंत कुणी त्याचा अंत्यविधी झालाय वगैरे सांगायलाही येऊ नये. गेल्या १० वर्षांपासून तो आमच्या संपर्कात नाहीये. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी”, असं त्या म्हणाल्या.
“फक्त फाशी नाही, ठेचला पाहिजे त्याला. जिवंत जाळला पाहिजे त्याला. तरीही माझ्या मनाची झालेली आग शांत होणार नाही. त्याचं नाव आमच्या नावाला जोडलंय त्यामुळे आम्हाला लोक जे काही बोलतील ते ऐकून घ्यावं लागेल”, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
मुलगा म्हणतो, “बाप म्हणवून घ्यायची लाज वाटते”
दरम्यान, याचवेळी नराधम आरोपीच्या तरुण मुलानं वडील म्हणून घ्यायचीही लाज वाटत असल्याचं सांगत परखड भावना मांडल्या. “मला तो माझा बाप म्हणून घ्यायचीही लाज वाटतेय. त्या चिमुकलीबाबत त्यानं अमानुष कृत्य केलं आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी. त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारला पाहिजे. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. मला ती माझ्या भाचीसारखीच आहे. मला ११ भाचा-भाची आहेत. मला या घटनेनंतर खूप वाईट वाटलंय. त्याला मारला पाहिजे. आम्हाला यात खूप मानसिक त्रास होतोय. आपण शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात राहातो. न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास वाढला पाहिजे असं आपण केलं पाहिजे”, अशा भावना मुलानं व्यक्त केल्या.
नसरापुरात नेमकं घडलं काय?
ही घटना गेल्या आठवड्यात शुक्रवारी १ मे रोजी भोर तालुक्यातल्या नसरापूर या ठिकाणी घडली. नराधम ६५ वर्षीय आरोपीने गावात या चिमुकलीचा पाठलाग करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांसोबत तिचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिचा मृतदेह सापडला. यानंतर गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तातडीने पोलिसांना पाचारण करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली.
आरोपीच्या विकृतीचा कळस
धक्कादायक बाब म्हणजे याआधीही आरोपीने अशा प्रकारचे पाशवी गुन्हे केल्याचा त्याचा इतिहास आहे. आरोपी मुळातच विकृत प्रवृत्तीचा असल्याचा जबाब ग्रामस्थांनी दिला आहे. याआधीही याच कारणासाठी गावकऱ्यांनी त्याची धिंड काढून त्याला गावाबाहेर हाकलून दिलं होतं. त्याला स्वत:ला ७ मुली आहेत. त्यांच्यावरही त्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा एका गावकरी महिलेनं केला. शिवाय, त्याची पत्नीच त्याला प्रत्येकवेळी पाठिशी घालत होती, असंदेखील त्यांनी सांगितलं. २०१५ साली या विकृत माणसानं एका छोट्या मुलीवर बलात्कार केला होता. तेव्हा त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होऊन शिक्षाही झाली होती. पण बायकोनं त्याची जामिनावर सुटका केली, अशी माहिती इथल्या ग्रामस्थांनी माध्यमांना दिली आहे. एका वृद्ध महिलेवरही त्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा ग्रामस्थांनी केला आहे.