संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
मुंबई: उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक निकालावर भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेत खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निकालाबद्दल काही मुद्दे मांडले आहेत. यात त्यांनी एकूण निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर शंका उपस्थित केल्या असून, आता ममता बॅनर्जींना साथ द्यायला हवी, असे आवाहन केले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव भाजपाने केला नाही, तर निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दले आणि सुमारे तीस लाख मतदारांना मताधिकार नाकारण्याने केला आहे."
महाराष्ट्राचा उल्लेख करत राऊत म्हणाले, 'निवडणूक चोरली'
पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, "ही निवडणूक जिंकली गेली नाही, तर चोरली गेली आहे. आपण ममता दीदींबरोबर उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्रात, बिहारात, हरयाणात, आसामात, ओडिशात अशाच प्रकारे निवडणूक चोरण्यात आली. या अशा विजयाचे ढोल फुटायला हवेत. जागे व्हा", असे संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींचा उल्लेख करत म्हटले आहेत.
अरविंद केजरीवालांनाही निकालावर शंका
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. "जी दिल्ली आणि पश्चिम बंगाल भाजपाला मोदी लाट शिखरावर असताना जिंकता आले नाही. २०१५ साली दिल्लीमध्ये आणि २०१६ साली बंगालमध्ये प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. त्या दिल्ली आणि बंगालमध्ये भाजपाने अशा काळात विजय मिळवला, जेव्हा मोदींची लोकप्रियता संपूर्ण देशात तळाला चालली आहे, असे कसे?", असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला आहे.