दुचाकीवर प्रवास करणारे एन. रंगास्वामी पाचव्यांदा होणार पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री

दुचाकीवर प्रवास करणारे एन. रंगास्वामी पाचव्यांदा होणार पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री

 

पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. पुद्दुचेरीत एनडीएतील घटक पक्ष असलेल्या ऑल इंडिया एनआर काँग्रेस (AINRC) , एआयएडीएमके, भाजपा आणि लाचिया जननायगा काची (एलजेके) या पक्षांची सत्ता कायम राहणार आहे. पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुकीसाठी विक्रमी ८९.८७ टक्के मतदान झाले होते. एनडीए विरूद्ध काँग्रेस-डीएमके अशी मुख्य लढत झाली. तसेच थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सर्वच ३० जागांवर उमेदवार दिले होते. टीव्हीके पक्षामुळे पुद्दुचेरीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता होती, परंतु तसे झाले नाही. पुद्दुचेरीत एआयएनआरसी (AINRC) पक्षाला १२, भाजपाला चार, एआयएडीएमके आणि एलजेके पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली.

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी त्यांच्या थट्टांचावादी मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला आहे. एन. रंगास्वामी हे पाचव्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री होणार आहेत. “ज्युनिअर कामराज” या नावाने ओळखले जाणारे एन. रंगास्वामी कोण आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

एन. रंगास्वामी यांचे साधे राहणीमान

७५ वर्षीय एन. रंगास्वामी यांनी कॉमर्स व लॉ संबंधित पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. के कामराज यांच्या प्रभावाने एन. रंगास्वामी यांनी वकिली सोडून राजकारणात प्रवेश केला. ते त्यांच्या साध्या रहाणीमानासाठी तसेच लोकांमध्ये मिसळणारे नेते म्हणून ओळखले जातात. यमाहा आरएक्स १०० या त्यांच्या दुचाकीवर ते फिरतात. २०१६ आणि २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी ते दुचाकी चालवत मतदान केंद्रावर पोहोचले होते. रंगास्वामी यांच्या व्यक्तिमत्वातील हेच पैलू पुद्दुचेरीच्या मतदारांना भावतात. मागील तीन दशकांपासून पुद्दुचेरीच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व आहे.

एन. रंगास्वामी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक योजना व विकासात्मक कामे केली आहेत. त्यांनी वयोवृ्द्धांसाठी पेन्शन योजना सुरू केली. त्याअंतर्गत २५०० ते ४००० रूपये दिले जातात. तसेच कुटुंबातील प्रमुख महिला सदस्याला २५०० रूपयांची रोख रक्कम दिली जाते. पुद्दुचेरीत त्यांच्या सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा वापर करणे सुरू केले. रंगास्वामी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागील कार्यकाळात रोजगार निर्मितीचे श्रेय घेतले होते. “आम्ही मागील पाच वर्षांत ५००० पदे भरली आहेत”, असे रंगास्वामी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला एप्रिल महिन्यात सांगितले होते. जर त्यांचे सरकार पुन्हा आले तर आणखी १ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल, असेही ते म्हणाले.

रंगास्वामी यांचा काँग्रेस ते एनआर काँग्रेसपर्यंतचा प्रवास

रंगास्वामी यांनी पहिल्यांदा काँग्रेसकडून १९९० मध्ये पुद्दुचेरी विधानसभेची निवडणूक थट्टांचावादी मतदारसंघातून लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तीन वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात सुमारे दहावर्ष मंत्री पद सांभाळले.

२००१ मध्ये रंगास्वामी पहिल्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २००६ मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पुन्हा एकदा रंगास्वामी यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. २००८ मध्ये काँग्रेसबरोबर मतभेद झाल्याने रंगास्वामी यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. २०११ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रंगास्वामी यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबर कधीही न मिटणारे मतभेद असल्याचे म्हटले होते. तसेच NRC या पक्षाची स्थापना केली.

एन. रंगास्वामी यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय अचूक ठरला. ते २०११ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. २०१६ च्या पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत रंगास्वामी यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढला. NRC ला फक्त आठ जागा मिळाल्याने जून महिन्यात त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर २०२१ पर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रंगास्वामी भाजपा प्रणित एनडीएत सहभागी झाले. २०२१ मध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर रंगास्वामी चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

रंगास्वामी यांच्या विजयाला महत्व का आहे?

पुद्दुचेरीला राजकीय अस्थिरतेचा इतिहास राहिला आहे. कालावधी पूर्ण करण्याआधीच सरकार अनेकदा कोसळले आहे. आघाड्या फुटल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय व केंद्र सरकारने नियुक्त केलेले नायब राज्यपाल यांच्यातील वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश असल्याने तेथील सरकारवर मर्यादा आहेत. प्रशासकीय अधिकार नायब राज्यपालांकडे आहेत. सरकार चालवताना निर्माण होणारे हे आव्हान एन. रंगास्वामी यांनी ओळखले आहे. “भारत सरकार चालवणारा पक्ष जर इथल्या सरकारचा एक भाग असेल तरच विकास होऊ शकतो”, असे रंगास्वामी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

रंगास्वामी आता पाचव्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री बनणार आहेत. एनडीएतील भाजपाला केंद्रशासित प्रदेशात सरकारमध्ये सहभागी होता येणार आहे. पुद्दुचेरी हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा देण्यात यावा ही मागणी वारंवार होते. रंगास्वामी यांनीही राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, या मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.