बारामतीत खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

बारामतीत खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

 


बारामती: खाजगी सावकारीच्या जाचाला कंटाळून बारामतीमध्ये एका ३८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव चंद्रकांत सकट (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे सकट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

कुटुंबीयांचा प्रशासनावर आणि सावकारांवर संताप

मृत वैभव यांचे वडील चंद्रकांत सिताराम सकट आणि त्यांच्या बहिणीने व्हिडिओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे. "माझा मुलगा वैभव याने खाजगी सावकारांच्या सततच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून स्वतःचे जीवन संपवले आहे," असा आरोप चंद्रकांत सकट यांनी केला आहे.

अजित दादा आणि सुनेत्रा वहिनींकडे न्यायाची आर्त हाक

या कठीण प्रसंगात पीडित कुटुंबाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच सुनेत्रा पवार यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. "आमच्या कुटुंबावर झालेला हा अन्याय दूर व्हावा आणि संबंधित खाजगी सावकारांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे," अशी कळकळीची विनंती मृत वैभव यांच्या वडिलांनी आणि बहिणीने केली आहे.

बारामतीमध्ये वाढत्या खाजगी सावकारीच्या पाशात अनेक निष्पाप जीव जात असल्याचा आरोप या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येत असून, आता पोलीस आणि प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.