लवकरच राज्याचे अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळेल; जय पवार यांचा मोठा दावा

लवकरच राज्याचे अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळेल; जय पवार यांचा मोठा दावा

 

बारामती: अजितदादांच्या निधनानंतर लगेचच अर्थसंकल्प मांडायचा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते त्यांच्याकडे ठेवले होते, मात्र आगामी काळात हे खाते पुन्हा राष्ट्रवादीकडेच येणार असल्याची माहिती युवा नेते जय पवार यांनी दिली.

बारामतीत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आजी माजी सदस्यांचा कृतज्ञता मेळावा सोमवारी (ता. २९) आयोजित केला होता. त्यात जय पवार बोलत होते. ते म्हणाले, अजितदादा आपल्यातून निघून गेल्यानंतर लगेचच अर्थसंकल्प सादर करणे क्रमप्राप्त होते, त्या मुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थखाते स्वताःकडेच ठेवून अर्थसंकल्प सादर केला.

मात्र काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार व माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली असून लवकरच पुन्हा अर्थखाते राष्ट्रवादीकडेच देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून लवकरच पुन्हा हे खाते राष्ट्रवादीकडे येणार आहे.

काही अधिकारी व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रारी येत असून मी बारामतीत लक्ष देणार असून वेळप्रसंगी सुनेत्रावहिनींपर्यंत आपण या बाबी नेऊन गरज असेल तेथे बदल घडविला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.