पुढील ३ वर्षे निवडणुका नाहीत, पण…; शरद पवारांचा विरोधकांना एकत्र आणण्याचा नवा प्लॅन

पुढील ३ वर्षे निवडणुका नाहीत, पण…; शरद पवारांचा विरोधकांना एकत्र आणण्याचा नवा प्लॅन

 


बारामती: सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित काम करावे अशीच सर्वांची भूमिका आहे, डीएमके पक्ष यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असला तरी आम्ही सगळे मिळून चर्चा करु. यातून काहीतरी चांगला मार्ग काढू, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. पुढील तीन वर्षे आता कोणत्याच निवडणुका नसल्याने सर्वांना एकत्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार माध्यमांशी संवाद साधत होते. शरद पवार म्हणाले, देशात सध्या दोन प्रमुख राजकीय गट दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप व त्यांचे सहकारी यांचा एक गट व ज्यांना त्यांचे विचार पटत नाहीत असा दुसरा गट आहे. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यातील अटी जाचक असल्याच्या तक्रारी आहेत,

या बाबत विचारता पवार म्हणाले, सरकार जेव्हा कर्जमाफीचे सूत्र ठरवते, त्यात काही अडचणी असतील तर त्यातून चर्चेद्वारे मार्ग काढता येऊ शकतो. यातील कमतरता दूर करून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल हे पाहिले पाहिजे. वादळी वारे व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पाच शास्त्रज्ञांनी येथे भेट देऊन आपला अहवाल दिलेला आहे, निसर्गापुढे काही चालत नाही पण यातून काय मार्ग काढणे शक्य आहे ते बघू, असे ते म्हणाले.

काहीतरी मार्ग निघेल
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी गटातील लोक काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात लढले. डीएमके विरोधी आघाडीतून बाहेर पडतेय, असे आजचे चित्र असले तरी प्रमुखांना आठ दहा दिवसांनी बोलावून यातून काहीतरी मार्ग काढू, मार्ग निघेल, याची मला खात्री आहे, असेही पवार म्हणाले.