पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही, कसा करायचा अर्ज?

पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही, कसा करायचा अर्ज?

 

आपलं लग्न धडक्यात करावं, अशी अनेकांची इच्छा असते. पण गरीबी किंवा आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना हे शक्य होत नाही. अनेकजण आपली हौस पूर्ण करण्यासाठी खासगी सावकार किंवा सरकारी बँकांमधून कर्ज काढून लग्न करतात. पण लग्न झाल्यानंतर हे कर्ज फेडण्यासाठी पुढची काही वर्षे कष्ट करावं लागतं. निम्मे पैसे तर व्याजासाठीच मोजावे लागतात. पण तुम्हाला सरकारच्या काही योजना माहीत असतील तर लग्नाळू पोरांच्या डोक्यावरचा आर्थिक भार काहीसा कमी होतो.

खरं तर, महाराष्ट्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. पण यातील बऱ्याच योजनांची लोकांना माहिती नसते. अशीच एक योजना म्हणजे 'प्रथम विवाह खर्च' योजना. ही योजना अनेकांना माहीत नाही. मात्र महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभाग आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या लग्नासाठी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सध्याच्या घडला एवढ्या एवढ्या पैशात लग्न होणं कठीण आहे. मात्र या पैशामुळे विवाह असलेल्या कुटुंबावरचा काहीसा ताण नक्कीच कमी होऊ शकतो.

'प्रथम विवाह खर्च' योजना नेमकी काय आहे?
महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागांतर्गत असलेल्या 'महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळा'कडून ही योजना चालवली जाते. या योजनेचं नाव 'प्रथम विवाह खर्च' योजना असून नोंदणीकृत कामगारांसाठी एक अत्यंत फायदेशीर योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगाराला स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी सरकारकडून ३०,००० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.

कोण करू शकतं अर्ज?

- अर्जदार हा बांधकाम क्षेत्रात किंवा बांधकाम संबंधित कामात गुंतलेला मजूर/कामगार असावा.
- तो कामगार 'महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळा'कडे (MBOCWWB) अधिकृतपणे नोंदणीकृत असावा.

अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वात आधी तुम्हाला मंडळाच्या (MBOCWWB) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या योजनेचा 'अर्ज फॉर्म' डाऊनलोड करावा लागेल. या अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि त्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडावेत. यानंतर हा अर्ज तुमच्या भागातील कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकाऱ्याकडे नेऊन जमा करावा. अर्ज जमा केल्यावर तिथल्या अधिकाऱ्याकडून पोहोच पावती नक्की घ्या. या पावतीवर अर्ज जमा केल्याची तारीख, वेळ आणि आयडी नंबर असल्याची खात्री करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला अर्जाची स्थिती तपासता येईल.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- आधार कार्ड.
- महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र (स्मार्ट कार्ड).
- बँकेचे पासबूक प्रत
- रहिवासी पुरावा (यापैकी कोणतेही एक: आधार कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / रेशन कार्ड / वीज बिल / ग्रामपंचायत प्रमाणपत्र).
- विवाह प्रमाणपत्र (लग्नाचा दाखला).