सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर होणार धारावीचा पुनर्विकास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर होणार धारावीचा पुनर्विकास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


मुंबई: सिंगापूर व हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जाणार आहे. देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारून रेल्वे व विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असून येथील नागरिक, त्यांची उपजीविका व स्थानिक वैशिष्ट्यांना केंद्रस्थानी ठेवून ठरलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

साेमवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक झाली. महापौर रितू तावडे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी, व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना, अजित बारोडिया उपस्थित होते.

धारावी पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात २०२८ पर्यंत किमान दहा हजार घरे नागरिकांना द्यावी. सर्व परवाने एकाच ठिकाणी व जलदगतीने मिळण्यासाठी विशेष कक्ष निर्माण करावा. येथील प्रमुख उद्योगांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष एमएसएमई योजना तयार केली जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

खाद्यपदार्थ उद्योगांसाठी ‘क्लाऊड किचन’ व महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा दिली जाणार आहे. पुनर्वसन इमारतींचे काम व इतर सुविधांची कामे टप्प्याटप्प्यांत सुरू आहेत, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना यांनी सादरीकरणात दिली.

१० वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
धारावीतील पुनर्वसन इमारतींचे काम ४२ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यातील काम मार्च २०२८ पर्यंत पूर्ण होईल. मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब केंद्रात विमान प्रवाशांसाठी ‘सिटी चेक-इन’ सुविधा असेल. जलवाहतुकीसाठी विमानतळापर्यंत फास्ट जेट्टी तर हवाई टॅक्सीसाठी व्हर्टीपोर्ट विकसित केला जाणार आहे. यामुळे रेल्वे, मेट्रो, रस्ता, जलमार्ग व हवाई वाहतूक अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.