“६० आमदारांच्या संख्याबळावर CM पद मागणे योग्य नाही”; प्रताप सरनाईकांचे विधान
एसटी ही सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने नियमित निरीक्षण करून तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले. बसस्थानकावरील स्वच्छता, सुरक्षा उपाययोजना, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तिकीट आरक्षण केंद्र तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्राची सखोल तपासणी केली. यावेळी प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि जाणून घेतल्या. काही ठिकाणी स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
६० आमदारांच्या संख्याबळावर CM पद मागणे योग्य नाही
पत्रकारांशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी एक कार्यकर्ता म्हणून आमची इच्छा आहेच. मात्र, शेवटी संख्याबळ महत्त्वाचे असते. २८८ पैकी ६० आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पद मागणे योग्य होणार नाही. आगामी काळात मोठे संख्याबळ निर्माण करावे लागेल. २०२९ मध्ये लोकसभा आणि विधानसभेत संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही सरनाईक यांनी नमूद केले.
दरम्यान, पक्षसंघटना बांधणीवर अधिक भर द्यावा. आगामी निवडणुकांमध्ये युती होईल किंवा नाही, शिवसैनिकांनी प्रत्येक मतदारसंघात मात्र पक्षाची भक्कम ताकद निर्माण करावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले. शिवसेना अकोला जिल्ह्याच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिरामध्ये त्यांनी हे आवाहन केले आहे.