नांदेडमध्ये मध्यरात्री भूकंपाचे दोन धक्के; ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, नागरिकांमध्ये घबराट

नांदेडमध्ये मध्यरात्री भूकंपाचे दोन धक्के; ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, नागरिकांमध्ये घबराट

 

नांदेड: नांदेड शहरासह परिसराला बुधवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदविण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील शिंदे पांगरा परिसरात असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की अनेक नागरिक झोपेतून दचकून जागे झाले. घरांना कंप जाणवताच नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. काही काळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव रोड, कावरानगर, निळा रोड यांसह शहराच्या विविध भागांत भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले. अनेकांनी सोशल मीडियावरही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती शेअर केली. दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त उशिरापर्यंत प्राप्त झाले नव्हते. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.