पतीसोबत वाद, १४ वर्षाच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडल्या; मायलेकीचे रेल्वे रुळावर सापडले मृतदेह
वर्षा पांडुरंग अधटराव (वय ३३ वर्षे) आणि स्वरा पांडुरंग अधटराव (वय १४ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. त्या सुशीलनगर परिसरात राहत होत्या.
रेल्वेरुळावर सापडले मायलेकींचे मृतदेह
वर्षा या आपल्या १४ वर्षाची मुलगी स्वराला घेऊन रागातच घरातून बाहेर पडल्या. शनिवारी रात्री त्या उशिरा घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्या पतीने त्यांचा शोध घेतला, पण दोघीही कुठेच सापडल्या नाही. त्यामुळे पतीने पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. रात्रभर शोध घेतल्यानंतर रविवारी पहाटे रेल्वे रुळावर झालेल्या अपघाताबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. सोलापूर ते टिकेकरवाडी दरम्यान, रेल्वे रुळावरील इलेक्ट्रिक खांबाजवळ दोघी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.
वर्षा आणि स्वरा यांना पोलिसांनी तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पतीसोबत वाद झाला अन् वर्षा...
प्राथमिक माहितीनुसार, वर्षा यांचे पती पांडुरंग यांच्यासोबत शनिवारी रात्री वाद झाला होता. वादानंतर रागाच्या भरातच त्यांनी १४ वर्षीय मुलीला सोबत घेतले आणि घर सोडले होते. त्यानंतर त्यांचे मृतदेह घरी आले.