उंडवडी टोलनाक्याजवळील अपघातात जय पवार यांची तातडीची मदत
बारामती: बारामती-पाटस मार्गावरील उंडवडी टोलनाक्यापुढे आज झालेल्या रस्ते अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. याचवेळी पुण्याकडे जात असलेले युवा नेते जय पवार घटनास्थळावरून जात असताना त्यांनी अपघात पाहताच आपला ताफा तात्काळ थांबवून जखमीच्या मदतीसाठी धाव घेतली.
जय पवार यांनी जखमीची प्रत्यक्ष विचारपूस करत त्याला तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली. त्यांनी आपल्या स्वीय सहाय्यकाला जखमीसोबत पाठवत उपचारात कोणतीही अडचण येऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपामुळे जखमीला वेळेत रुग्णालयात हलविणे शक्य झाले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जय पवार यांच्या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे कौतुक केले. अपघातग्रस्त व्यक्तीला योग्य वेळी मदत मिळाल्याने मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संकटाच्या क्षणी त्वरित मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपण्याची भूमिका जय पवार यांनी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिली. त्यांच्या या मानवतावादी कृतीची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.