मुंबईतील प्रसिद्ध 'के. रुस्तम आईस्क्रीम'चा परवाना रद्द; तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर एफडीए ची धडक कारवाई

मुंबईतील प्रसिद्ध 'के. रुस्तम आईस्क्रीम'चा परवाना रद्द; तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर एफडीए ची धडक कारवाई

 


मुंबई: दक्षिण मुंबईतील चर्चगेट येथील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक 'के. रुस्तम अँड कंपनी'या आईस्क्रीम पार्लरवर अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी (८ जुलै २०२६) मोठी धडक कारवाई केली. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विशेष आदेशानुसार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीसाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान या नामवंत प्रतिष्ठानात अत्यंत गंभीर त्रुटी, अस्वच्छता आणि मुदतबाह्य साहित्याचा वापर होत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने या दुकानाचा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

बेसिनमध्ये ओतले एक्सपायर्ड फ्लेव्हर्स!

अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती तेजस्विनी व्ही. पाटील आणि श्री. आकाश चव्हाण यांच्या पथकाने ग्रेटर मुंबई झोन ०१ अंतर्गत या दुकानात अचानक धाड टाकली. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य कृत्रिम फ्लेव्हर्स आणि इसेन्स सापडले. यामध्ये पिस्ता, पायनॅपल, स्वीट ऑरेंज, चेरी आणि बदाम फ्लेव्हर्स, अमेरिकन आयस्क्रिम सोडा, मिक्स फ्रूट, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅक करंट फ्लेव्हर्स, रम जमैका एलबी, लेमन आणि प्लम इसेन्स या साहित्याचा समावेश होता.

हजारो रुपयांचे हे मुदतबाह्य साहित्य आईस्क्रीम बनवण्यासाठी पुन्हा वापरले जाऊ नये, म्हणून अधिकाऱ्यांनी दुकानदाराच्या समोरच या सर्व बाटल्यांचे सील तोडून ते तिथल्या बेसिनमध्ये ओतून नष्ट केले.

उंदीर, माश्यांचा सुळसुळाट आणि कोल्ड चेन फेल!

या नामवंत दुकानात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे तपासात उघड झाले. तपासणी दरम्यान तिथे जिवंत उंदीर आणि माश्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. तसेच आईस्क्रीम सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी कोल्ड चेन पूर्णपणे कोलमडलेली आढळली. याशिवाय, नियमानुसार आवश्यक असणारी कोणतीही कागदपत्रे किंवा नोंदी दुकानात ठेवण्यात आल्या नव्हत्या.

फॅटचे प्रमाण कमी; आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत

एफडीएच्या पथकाने रासायनिक विश्लेषणासाठी आईस्क्रीमचे नमुने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या बाह्य प्रयोगशाळेच्या अहवालात रुस्तमच्या आईस्क्रीममध्ये फॅटचे प्रमाण ७.९४% आढळले होते, जे FSSAI च्या नियमानुसार आवश्यक असणाऱ्या १०% पेक्षा खूपच कमी होते. यामुळे ग्राहकांची शुद्धतेच्या नावावर फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले.

परवाना तात्काळ निलंबित; अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये!

ग्रेटर मुंबई झोन १ च्या सहाय्यक आयुक्त तथा पदसिद्ध अधिकारी श्रीमती अनुपमा बालसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ३२(३) अंतर्गत 'के. रुस्तम'चा परवाना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले. जॉइंट कमिशनर (अन्न) श्री. पी. आर. शिंगारवाड यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

मुंबईकरांची पहिली पसंती असलेल्या या ऐतिहासिक आयस्क्रिम पार्लरमध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा समोर आल्याने खाद्यप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्रुटींची पूर्तता होईपर्यंत हे दुकान आता बंद राहणार आहे.