फलटण रस्त्यावर वीजवाहिनीचा जीवघेणा सापळा; दोन प्राण्यांचा करंट लागून मृत्यू; बाप-लेक थोडक्यात बचावले
बारामती: फलटण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या वीजवाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अधिग्रहित झालेली काही घरे अद्याप हटविण्यात आलेली नसल्याने वीजवाहिनीचे भूमिगत (अंडरग्राऊंड) काम रखडले आहे. परिणामी, सुमारे वर्षभरापूर्वी करण्यात आलेले वीजवाहिन्यांचे लाईन शिफ्टिंग आजही तात्पुरत्याच स्वरूपात असून, त्याचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.
रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबी किंवा इतर अवजड वाहनाचा धक्का वीजवाहिनीला लागल्याने केबल मधील तार उघडी झाली आणि त्यामध्ये करंट प्रवाहित झाला. या घटनेत एका कुत्र्याचा आणि एका मेंढीचा जागीच मृत्यू झाला. याच वेळी त्या ठिकाणी असलेले बाप-लेक थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘अपघात नव्हे, प्रशासनाच्या विलंबाचा परिणाम?’
* अधिग्रहित घरे हटविण्याचे काम रखडले.
* वर्षभरापासून तात्पुरती वीजलाइन कायम.
* भूमिगत वीजवाहिनीचे काम थांबले.
* जेसीबीच्या धक्क्याने वीजवाहिनी धोकादायक ठरली.
* कुत्रा व मेंढीचा करंट लागून मृत्यू.
* बाप-लेक थोडक्यात बचावले.
* नागरिकांकडून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी.