अवैध दारू वाहतुकीला माळेगाव पोलिसांचा दणका; कार-मोटारसायकलसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
बारामती: माळेगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात धडाकेबाज कारवाई करत तब्बल ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कऱ्हावागज चौक परिसरात सापळा रचला. यादरम्यान, संशयित मोटारसायकल आणि त्यानंतर तिथे आलेल्या एका अल्टो कारवर पोलिसांनी नजर ठेवली. दारूचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांची नावे शेखर श्रीरंग पवार (रा. राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि कैलास शंकर गव्हाणे (रा. माळेगाव बु., ता. बारामती, जि. पुणे) असल्याचे समोर आले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
झडतीदरम्यान पोलिसांनी खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला:
३३ बॉक्स देशी दारू
गावठी हातभट्टीची दारू असलेले दोन ड्रम
एक मारुती सुझुकी अल्टो कार
एक मोटारसायकल
एकूण मत्ता: ४ लाख ४६ हजार ५०० रुपये.
मोठी कारवाई:
आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दानेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे जाऊन गावठी हातभट्टीची दारू तयार करणारी भट्टी देखील उद्ध्वस्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत. माळेगाव पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून, अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही अशीच तीव्र राहील, असे संकेत मिळत आहेत.