तिरंग्याच्या रोषणाईने बारामती नगर परिषद भवन उजळले; स्वातंत्र्यदिनाचा उत्साह शिगेला
बारामती: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेची इमारत आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आली आहे. तिरंग्याच्या रंगातील रोषणाईमुळे नगर परिषद भवनाचा परिसर लक्षवेधी ठरत असून, नागरिकांमध्ये १५ ऑगस्टच्या उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहरातील विविध प्रमुख ठिकाणी सजावट करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषद इमारतीवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या आकर्षक प्रकाशझोतात नगर परिषद भवन उजळून निघाले आहे. रात्रीच्या वेळी ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांचीही उत्सुकता दिसून येत आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, १५ ऑगस्टच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.