‘अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती पोरकी’, ‘त्या’ व्हायरल पत्रावर युगेंद्र पवार यांचे महत्त्वाचे विधान

‘अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती पोरकी’, ‘त्या’ व्हायरल पत्रावर युगेंद्र पवार यांचे महत्त्वाचे विधान

 

बारामती: बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांना उद्देशून एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अज्ञात व्यक्तीने लिहिलेले हे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीमध्ये कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, नागरिकांमध्ये वाढत असलेले दहशतीच्या वातावरणाबद्दल पत्रात माहिती दिली आहे. या पत्रावर आता युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

युगेंद्र पवार काय म्हणाले?

बारामतीमधील वाढती गुन्हेगारी, नगरपरिषदेचा कारभार आणि इतर प्रश्नांबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र व्हायरल झाल्यानंतर युगेंद्र पवार यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, “बारामतीमध्ये यापूर्वीही बेनामी पत्र व्हायरल करण्यात आले होते. आता एक नवीन पत्र आले आहे. हे बेनामी पत्र असून लिहिणाऱ्याने स्वतःचे नाव लिहिले नाही. मी आवाहन करतो की, ज्यांनी पत्र लिहिले आहे, त्यांनी पुढच्या वेळेस स्वतःचे नाव लिहावे, जेणेकरून चर्चा करता येईल. त्यांची अडचण आम्हाला समजून घेता येईल.”

आम्ही बारामतीमध्ये आठवड्यातले पाच दिवस असतो. इतरही जण असतात. मी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या सत्तेत नाहीत. आमचा पक्ष वेगळा आहे. सत्तेत नसून सुद्ध मी जास्तीत जास्त वेळ बारामतीकरांना देत आहे, असे युगेंद्र पवार पुढे म्हणाले.

‘होय, बारामती पोरकी झाली’

व्हायरल पत्रात बारामती पोरकी झाल्याबाबत उल्लेख आहे. याबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, अजित पवारांच्या जाण्याने निश्चितच बारामती पोरकी झाली. अजित पवार मोठे नेते होते. त्यांचे आणि बारामतीचे नाते वेगळे होते. त्यांनी या शहरासाठी वेळ दिला. त्यांची जनतेबरोबर नाळ जुळलेली होती. सत्ता नसून सुद्धा आम्हाला जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न आहोत. जे सत्तेत आहेत, त्यांनी थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढली

युगेंद्र पवार पुढे म्हणाले, “बारामतीमध्ये १०० टक्के गुन्हेगारी वाढत चालली आहे. महिन्याभरात बारामतीमध्ये भयानक गोष्टी घडल्या आहेत. ज्या आधी कधी घडत नव्हत्या. अजित पवारांचा बारामतीमध्ये वचक होता. त्यामुळे समाजकंटक घाबरून असायचे. पण आता तो वचक राहिलेला नाही. त्यामुळे सत्तेत असलेल्यांनी थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारी यंत्रणेला इथे ताकद दिली पाहिजे आणि बारामतीमधील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घातला पाहिजे.”

अजित पवारांची जागा कुणीही भरून काढू शकत नाही. त्यांची उणीव नेहमी जाणवत राहिल. पण आमच्यापद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. वेळ देत आहोत. आमच्याकडून शक्य असतील तितकी कामे करण्याचा प्रयत्न करत आहोत. इथून पुढेही काम करत राहू, असेही युगेंद्र पवार म्हणाले.