मुंबईतील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

 


मुंबई: मुंबईतील महर्षी कर्वे रोडवर असलेल्या आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये सोमवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबई अग्निशमन दलाला सोमवारी दुपारी २:०१ वाजता आयकर भवनात आग लागल्याची माहिती मिळाली.  घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या गाड्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थितीचा अंदाज घेऊन दुपारी २:१० वाजता या आगीला 'लेव्हल-१' ची आग म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासोबतच संपूर्ण इमारतीची पाहणी आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच या आगीत किती आर्थिक नुकसान झाले आहे, याचा सविस्तर तपशील समोर आलेला नाही. आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर आणि कुलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यावरच आगीचे अचूक कारण आणि किती नुकसान झाले, हे स्पष्ट होईल.