साखरेच्या भावात एकाच आठवड्यात मोठा उलटफेर! रॉकेटसारखा आकाशात गेलेला भाव आपटला, आता दर किती?
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६
Edit
मुंबई/कोल्हापूर : मागील काही दिवसात साखरेच्या दरात वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांचे तोंड महागाईने कडू झाले होते. साखरेच्या दरात दोन महिन्यात जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाल्याने किचन बजेट बिघडले.
साखरेच्या वाढलेल्या दरावरून लोकांमध्ये संताप व्यक्त होताच , केंद्र
सरकारने तातडीने पावले उचलली. आता, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.
साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
साखर बाजारात निर्माण झालेली अनैसर्गिक दरवाढ अवघ्या एका आठवड्यात पूर्णपणे
ओसरली आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल ६,४०० रुपयांच्या विक्रमी
टप्प्यावर पोहोचलेले साखरेचे दर तब्बल १,५०० रुपयांनी खाली आले आहेत.
गुरुवारी (२७ ऑगस्ट) साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल ४,८०० ते ५,००० रुपये
असा रास्त दर मिळाला आहे. त्यामुळे देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसल्याचे
आता स्पष्ट झाले आहे.
जुलैच्या अखेरीस व ऑगस्टच्या
पहिल्या आठवड्यात साखरेचे दर ४,५०० रुपयांच्या आसपास होते. १४ ऑगस्टला ते
४,७०० ते ४,८०० रुपयांपर्यंत वाढले. त्यानंतर बाजारात साखरेची तीव्र टंचाई
असल्याचे आभासी चित्र निर्माण करून अवघ्या सात दिवसांत दर ६,४०० रुपयांवर
नेण्यात आले. या अनैसर्गिक दरवाढीचा फायदा शेतकरी किंवा कारखान्यांऐवजी
साठेबाजांनाच मिळण्याची शक्यता होती.
केंद्र सरकार आलं अॅक्शनमोडमध्ये...
मात्र, राज्य व राष्ट्रीय साखर संघाने देशात पुरेशी साखर शिल्लक असल्याचे
स्पष्ट केले. त्यानंतर केंद्र सरकारने तत्परतेने साखरसाठ्याचा आढावा घेत
साठा मर्यादा (Stock Limit) लागू केली आणि आयातीची घोषणा केली. दुसरीकडे
शेतकरी संघटनांनी याप्रकरणी २० हजार कोटींचा साखर घोटाळा होत असल्याचा आरोप
करत तीव्र आक्रमक पवित्रा घेतला. या चौफेर दबावामुळे साठवणूकदारांचे
मनसुबे उधळले गेले आणि बाजारातील वातावरण अवघ्या आठवड्यात पूर्वपदावर आले.
२६ ऑगस्टला साध्या साखरेचे दर ५,१५० ते ५,२५० रुपयांपर्यंत खाली आले, तर
२७ ऑगस्टला साध्या साखरेला ४,८०० रुपये आणि मोठ्या साखरेला ५,००० रुपये
प्रतिक्विंटल असा दर मिळाला.
साखर उद्योग अभ्यासक
योगेश पांडे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, ''साखरेचा तुटवडा
नव्हताच. साठेबाजांनी केलेली ही दरवाढ पूर्णपणे अनैसर्गिक होती, हा राजू
शेट्टींचा दावा अखेर खरा ठरला. यातून साठेबाजांचा फुगा फुटला असला, तरी ऐन
मोक्याच्या क्षणी चढ्या दराने साखर खरेदी करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांचे
लाखोंचे नुकसान झाले आहे. या नुकसानाला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी
केला.
पुढील काळात साखरेला स्थैर्य मिळण्याची चिन्हं
येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामाच्या तोंडावर देशात
सुमारे ३० ते ३४ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. तसेच
आगामी हंगामातही गरजेनुसार पुरेसे उत्पादन होणार असल्याने किरकोळ बाजारात
साखरेचे दर प्रतिकिलो ४५ रुपयांच्या आसपास स्थिर राहण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.