आंदोलनाचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांचे जरांगेंना आवाहन; एकटाच मुंबईला जाणार; मनोज जरांगे भूमिकेवर ठाम
दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर आता एकटेच मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा आंदोलकांच्या जवळपास सर्वच मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. काही मागण्या न्यायालयाच्या निर्णयाधीन आहेत. न्यायालय किंवा इतर संवैधानिक पद्धतींचा अवलंब करूनच त्या आपण पूर्ण करू शकतो.
गणेशोत्सवाला सोमवारपासून प्रारंभझाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी देखील गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आम्ही चर्चेची दारे बंदही केलेली नाहीत. सध्या गणेशोत्सव सुरू आहे, गणेशभक्तांना असुविधा होईल, असे कोणी वागू नये. त्यामुळे मुंबई आंदोलन करण्याबाबत पुनर्विचार व्हावा असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
अंतरवाली सराटीतून मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. पाणी, सलाईन व औषधोपचार बंदच ठेवणार असून आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.