"माझा Gen-Zवर जास्त विश्वास, ते अधिक प्रामाणिक"; मोहन भागवतांचे लंडनमध्ये मोठे विधान
जेन-झी आणि जेन-अल्फाबद्दल बोलताना भागवत म्हणाले, "मला पुढील पिढ्यांवर अधिक विश्वास आहे. जग अधिक चांगले बनवण्याची त्यांची इच्छा आहे, ते क्षुल्लक मतभेद विसरण्यास तयार आहेत आणि ते अधिक प्रामाणिक आहेत. देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी व्हावे लागेल. हे लक्षात घेऊन, आपण आत्मनिर्भर झाले पाहिजे. पण त्यासोबतच परस्परांवर अवलंबून राहणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला पाठिंबा देणे हे देखील सुरू राहायला हवे." असेही ते म्हणाले.
हिंदू राष्ट्राचा उद्देश काय?
"हिंदू राष्ट्रा'चा उद्देश जगाला हा संदेश देणे आहे की विविधता नैसर्गिक आहे आणि एकी हेच सत्य आहे. हिंदू विचार या कल्पनेवर आधारित आहे की, अस्तित्व जरी वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट झाले तरी ते वास्तविक एकच आहे. विविधता नैसर्गिक आहे आणि आपण ती स्वीकारून तिचा आदर केला पाहिजे. जर एखाद्या हिंदूचा असा विचार असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर त्याला हिंदू म्हणता येणार नाही. जर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवत असाल, तर तुमचा असा विश्वास असला पाहिजे की सर्व मार्ग एकाच अंतिम ध्येयाकडे जातात. माणसांमध्ये कोणताही भेद नाही," असे मोहन भागवत म्हणाले.