पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक! पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “आज विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान पार पडत आहे. मागील निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल पाहता महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या पाठीशी ठाम उभी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेले गतिमान विकासाचे काम जनतेने पाहिले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार हा अत्यंत सुशिक्षित, जाणकार आणि विचारवंत आहे. देशात, राज्यात आणि जागतिक स्तरावर काय घडते आहे याची त्याला पूर्ण कल्पना असते. त्यामुळे विचार आणि विकासाला साथ देत हा सुशिक्षित वर्ग महायुतीलाच कौल देईल आणि आम्ही पाचही जागा जिंकू.”
गोकुळ वेगळे आणि ही निवडणूक वेगळी
कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या राजकारणाचा या निवडणुकीवर परिणाम होईल का, यावर बोलताना मोहोळ यांनी दोन्ही क्षेत्रांतील फरक स्पष्ट केला. ते म्हणाले, “सहकारातील निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे. दोन्हीची गणिते भिन्न आहेत. त्यामुळे स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे शंभर टक्के विजयी होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. काही ठिकाणी पक्षनेतृत्वाने मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला असला, तरी युतीवर विश्वास ठेवणारा मतदार अखेर भाजपसोबतच राहील. कौस्तुभ गावडे यांचा अनुभव आणि पार्श्वभूमी पाहता त्यांचा विजय निश्चित आहे.”
ऑडिओ क्लिपवर बोट दाखवणे योग्य नाही
मनोज जरांगे यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, प्रसारित झालेल्या क्लिपबाबत ते त्यांच्या बाजूने योग्य भूमिका मांडत असतील, ज्याच्या त्याच्या जागी ते योग्य आहेत. मात्र नेमके काय घडले आणि ते कोणी केले हे ठोसपणे कोणी सांगू शकत नाही. यावर केवळ एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा सखोल चर्चा झाली पाहिजे. जनता आणि संबंधित घटक यावर विचार करण्यास पूर्णपणे समर्थ आहेत.
लोकशाहीत संख्याबळच महत्त्वाचे
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना मोहोळ यांनी स्पष्ट शब्दांत लोकशाहीचे वास्तव मांडले. “कार्यकर्त्यांनी किंवा सहकाऱ्यांनी आपल्या नेत्याबद्दल आदर आणि चांगल्या भावना बाळगणे स्वाभाविक आहे. मात्र लोकशाही व्यवस्थेत शेवटी संख्याबळ आणि आकड्यांचे गणितच सर्वोच्च असते. त्या संख्याबळाच्या आधारेच निर्णय होतात आणि तेच अंतिम ठरते,” असे सांगत त्यांनी या चर्चेवर सूचक वक्तव्य केले.