लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०० व्या साहित्य संमेलनानिमित्त बारामतीत साहित्यिक अभिवादन

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०० व्या साहित्य संमेलनानिमित्त बारामतीत साहित्यिक अभिवादन

 

बारामती दि.२४ : महाराष्ट्र साहित्य परिषद, बारामती शाखेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०० व्या साहित्य संमेलनानिमित्त बुधवार,दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी बारामती येथे विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे निर्माण झालेल्या शोकमय वातावरणाची जाणीव ठेवून, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्याच्या भावनेतून या उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

बारामतीच्या शैक्षणिक, साहित्यिक,नाट्य आणि सांस्कृतिक जडणघडणी मध्ये लोकनेते अजित दादांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. बारामतीतील विविध शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक चळवळी आणि कलाक्षेत्राला त्यांनी सातत्याने पाठबळ दिले.नव्या पिढीला शिक्षणाबरोबरच साहित्य,कला आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभावी, यासाठी त्यांनी सदैव प्रोत्साहन दिले. त्यांच्या जाण्याने बारामतीच्या सार्वजनिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

      अशा परिस्थितीत साहित्य, रंगभूमी आणि संगीताच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणे, त्यांनी जपलेल्या सांस्कृतिक मूल्यांचा वारसा पुढे नेणे आणि नवोदित कलाकारांना वैचारिक व कलात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या भावनेतून सदर उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.संपूर्ण आयोजन संयत आणि स्मृतिप्रधान वातावरणात करण्यात येणार आहे.

सकाळी १०.३० वाजता तीन ठिकाणी एकांकिका सादरीकरण

बुधवार,दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शारदानगर येथील पी.जी.आर.सी. सेंटर या तीन ठिकाणी एकांकिका सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील उपक्रमात नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, लेखक,दिग्दर्शक व नाट्यसमीक्षक राज काझी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश सोमण सहभागी होणार आहेत. शारदानगर येथील उपक्रमात प्राचार्य राजकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत 'रंग जगण्याचा' या एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

या तिन्ही ठिकाणी एकांकिका या साहित्यप्रकाराचे महत्त्व, त्यातील आशय, लेखन आणि रंगभूमीशी असलेले नाते याविषयी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

री ४ वाजता एकांकिका लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयावर विचारमंथन

दुपारी ४ वाजता बारामती येथील डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात 'एकांकिका लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय' या विषयावर साहित्यिक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

या परिसंवादात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष राज काझी, ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते श्रीष देशपांडे आणि नाट्यदिग्दर्शक व अभिनेते विवेक पांडकर सहभागी होणार आहेत.

एकांकिका लेखनातील आशयघनता, दिग्दर्शनातील सर्जनशीलता, अभिनयाची अभिव्यक्ती आणि मराठी रंगभूमीसमोरील बदलती आव्हाने यांवर या परिसंवादातून विचारमंथन होणार आहे.

सायंकाळी ५.३० वाजता प्रवीण तरडे यांच्याशी संवाद

सायंकाळी ५.३० वाजता डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील त्यांचा प्रवास, लेखन, अभिनय, दिग्दर्शन तसेच साहित्य आणि समाजजीवन यांच्यातील परस्परसंबंध यांचा या संवादातून वेध घेतला जाणार आहे. यावेळी राज काझी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचीही उपस्थिती राहणार आहे.

सायंकाळी ७ ते ९ — 'आठवणीतील अजितदादा : लब्जों का सफर'

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दर महिन्याच्या २८ तारखेला आयोजित करण्यात येणाऱ्या श्रद्धांजलीपर गीतांच्या सादरीकरणाचाही यंदा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०० व्या साहित्य संमेलनाशी संबंधित उपक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

'आठवणीतील अजितदादा--लब्जों का सफर' या संकल्पने अंतर्गत गझल,सुफी आणि कव्वाली गीतांच्या माध्यमातून अजितदादांना स्वरमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

   सायंकाळी ७ ते ९ या वेळेत बारामती येथील तिरंगा सर्कल परिसरातील नटराज नाट्य कला मंदिरात हे सादरीकरण होणार आहे.

यामध्ये गायिका तेजस्विनी पाहुजा, गायक आशिष देशमुख आणि आकाश सोळंकी हे आपल्या गायनातून अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. वाद्यवृंद संचालन मुकेश दैडिया करणार असून, रशीद शेख, अपूर्व द्रविड आणि नंदू डेव्हिड हे वादक साथसंगत करणार आहेत.

अजितदादांच्या आठवणी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी या भावना संगीताच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. या श्रद्धांजलीपर सादरीकरणाला कोणतेही उत्सवी स्वरूप नसून, त्यांच्या स्मृतींना आदरपूर्वक उजाळा देण्याची ही भावपूर्ण अभिव्यक्ती असणार आहे.

अजितदादांच्या स्मृतींना साहित्यिक व सांगीतिक अभिवादन

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांनी बारामतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच येथील शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांनी जपलेली विकासाची दृष्टी, कर्तृत्वाला दिलेले प्रोत्साहन आणि नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेले प्रयत्न हीच त्यांची चिरंतन ओळख आहे.

त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत साहित्य, विचार, रंगभूमी आणि संगीताचा हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येत आहे.

बारामती परिसरातील साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, लेखक, नाट्यकलावंत, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी या उपक्रमांना उपस्थित राहून लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

किरण गुजर

नटराज नाट्य कला मंडळ, बारामती