बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण; २ लाखांची सुपारी दिल्याचे तपासात उघड
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६
Edit
बारामती : बारामतीतील उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरील सशस्त्र हल्ला प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती बारामती तालुका पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह दोघांची नावे समोर आली असून, दोन प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चित्रपट करा
१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बारामतीतील विमानतळा समोर असलेल्या पायलट ढाब्यासमोर, पालखी महामार्गावर राणा सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला केला होता. या घटनेमुळे बारामती शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पुणे शहर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पार्थ वासुदेव अवथळे (वय १९) याला पकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०) यांचे नाव समोर आले. राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
त्यानंतर पोलिसांनी पार्थ अवथळे आणि ज्ञानदेव शिंदे यांना २० ऑक्टोबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.