मुंबई : टोरेंटचा प्रकल्प ३ हजार मेगावॅटचा प्रकल्प आहे. ३ हजार मेगावॅट कोळशाच्या प्रकल्पामुळे जे प्रदूषण होईल ते दूर करण्यासाठी २८ कोटी झाडे लागतील. या प्रकल्पाला विरोध केला तर कोळशाची वीज वापरावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
ते म्हणाले की, आपण सौर आणि पवनउर्जेचा वापर करतो. मात्र या ऊर्जा चोवीस तास आपल्याला मिळत नाहीत. त्यांना मर्यादा आहेत, त्याचा परिणाम ग्रीडवर होत असतो. जगामध्ये चोवीस तास ऊर्जा देण्यासाठी पंप स्टोरेज पद्धत वापरली जाते. पीक अवरला पूर्णपणे प्रदूषणमुक्त ऊर्जा उपलब्ध होते. या प्रकल्प परिसरात सुमारे ९० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्र वन विभागाला वनीकरणासाठी देण्यात आले असून, प्रकल्पाच्या जागेवर स्वतंत्रपणे आणखी ६० हजार झाडे लावण्यात येणार आहेत.
बॅटरी स्टोरेज प्रकल्पांच्या तुलनेत पंप स्टोरेज प्रकल्पांचे आयुष्य अधिक असल्याचे सांगताना त्यांनी बॅटरीची साधारण २५ वर्षांची आणि पंप स्टोरेज प्रकल्पाची सुमारे ८० वर्षांची कार्यक्षमता असते. बॅटरी तंत्रज्ञानासाठी परदेशावरील, विशेषतः चीनवरील अवलंबित्व असू शकते; मात्र पंप स्टोरेजसाठी आवश्यक तंत्रज्ञान भारतात उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
ती जागा अधिक उपयुक्त
पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी कोणतीही जागा निवडता येत नसून, त्यासाठी भौगोलिक आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य स्थळांची निवड करावी लागते. पश्चिम घाटातील स्थळे या दृष्टीने अधिक उपयुक्त असल्याचे सांगत केंद्र सरकारनेही पंप स्टोरेज प्रकल्पांना हरित प्रकल्पांच्या श्रेणीत स्थान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सौर आणि पवनऊर्जेचा समतोल राखण्यासाठी चीनमध्ये आतापर्यंत सुमारे ६० हजार मेगावॅट क्षमतेचे पंप स्टोरेज प्रकल्प उभारण्यात आल्याचा, तसेच २०३० पर्यंत आणखी मोठी क्षमता उभारण्याचे नियोजन असल्याचा दाखला त्यांनी दिला. भारताला कोळशावरील वीजनिर्मितीमुळे होणारे प्रदूषण कमी करायचे असेल, तर पंप स्टोरेज तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ग्रामस्थांचे मत ऐकण्यास तयार
प्रकल्पाबाबत जर योग्य अभ्यास केला तर विरोध किती अनाठायी आहे हे कळून येईल. या प्रकरणी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकण्यास सरकार तयार आहे. आरे मेट्रो कारशेडलाही अशाच विरोध झाला. पण सर्वोच्च न्यायालयाने यामुळे किती प्रदूषण रोखण्यात यश येईल हे दाखवून दिले. पण ज्यांना राजकारण करायचे ते करत राहतील, असे ते म्हणाले.