"एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने...", एकनाथ शिंदेंच्या सेनेवर भाजपाने फोडले पराभवाचे खापर, रवींद्र धंगेकरांच्या हकालपट्टीची मागणी

"एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने...", एकनाथ शिंदेंच्या सेनेवर भाजपाने फोडले पराभवाचे खापर, रवींद्र धंगेकरांच्या हकालपट्टीची मागणी

 


मुंबई : "शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही", असे म्हणत भाजपाचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिंदेसेनेवर पराभवाचे खापर फोडले. बन यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

राज्याच्या सत्तेत असूनही विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपाची पिछेहाट झाली. तीन पैकी एकच जागा भाजपाला जिंकता आली. या निकालानंतर भाजपातून थेट शिंदेंच्या शिवसेनेला जबाबदार धरले जात आहे. भाजपाचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आधी एक पोस्ट करत आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. 

महायुतीतीचा उमेदवार असताना शिंदेसेनेचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

"पुणे पदवीधर मतदारसंघात सचिन सानप यांना मिळालेली १६ हजार मते भाजपाकडे वळली असती, तर स्मिता जाधव या पहिल्या फेरीतच विजयी झाल्या असत्या. मित्र पक्षाकडून एका जागेच्या हव्यासापोटी, ती जागाही त्यांची अधिकृत नव्हती. अधिकृत उमेदवार दिला नव्हता. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे पुण्यात महायुतीचा एका जागेवर पराभव झाला", असा आरोप नवनाथ बन यांनी शिंदेसेनेवर केला आहे. 

"एकाच जागेवर फटका बसला असे नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. चव्हाण यांच्याविरोधात अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे भूमिका घेतली आणि मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने विरोधात काम केले", असे म्हणत बन यांनी संताप व्यक्त केला. केशव उपाध्ये यांनीही याबद्दल भाष्य केले आहे.

नवनाथ बन यांनी दाखवले पुरावे, धंगेकरांची हकालपट्टी करण्याची मागणी

"शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी पदवीधरांना आवाहन केले की, भाजपाच्या उमेदवार स्मिता जाधव यांना मतदान करू नका. धंगेकर हे शिवसेनेचे महानगरप्रमुख आहेत. अशा पद्धतीने मित्रांनी आणि रवींद्र धंगेकर यांनी केसाने गळा कापण्याचा निर्णय घेतला असेल, तर एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे", अशी मागणी बन यांनी केली. 

"भाजपाच्या स्मिता जाधव पराभूत झाल्यावर धंगेकरांनी पुन्हा पोस्ट केली आणि शाबास पदवीधरांनो असे म्हटले. याचा अर्थ पदवीधर मतदारसंघात काम केले नाही. माझा एकनाथ शिंदेंना सवाल आहे की, तुमचे महानगर प्रमुख भाजपाला मतदान करू नका म्हणतात. अमरावतीत आमच्या काहींनी बंडखोरी केली. त्यांना आम्ही बडतर्फ केले. रवींद्र धंगेकरांबद्दल अशी भूमिका शिंदे घेणार आहेत का? कारवाई करणार आहात का?", असे बन म्हणाले.

"आम्ही खापर फोडत नाहीये. तर आम्ही पुरावे देत आहोत. खापर फोडणे कशाला म्हणतात की, त्याला काहीही तथ्य नसेल. आम्ही हवेत गोळीबार करत असेल, तर त्याला खापर फोडणे म्हणतात. रवींद्र धंगेकर तुम्ही म्हणीचा अर्थ समजून घ्या", असा टोला बन यांनी लगावला.