पाणी बचतीचे आवाहन करणारे प्रशासनच गाफील! भोसले वस्तीवर पाण्याचा पूर..

पाणी बचतीचे आवाहन करणारे प्रशासनच गाफील! भोसले वस्तीवर पाण्याचा पूर..

 

बारामती : बारामती नगरपरिषद हद्दीतील तांदुळवाडी येथील भोसले वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यावरील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावरून वाहून वाया जात आहे. या पाण्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला असून, येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, संबंधित विभागाने तातडीने याची दखल घेऊन फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.

     पाईपलाईनमधून सतत पाणी वाहत असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या निसरड्या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याची नासाडी तर होतच आहे, शिवाय रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्याच्या मार्गातही अडथळे निर्माण होत आहेत.

     एकीकडे नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. मात्र दुसरीकडे नगरपरिषद हद्दीतच मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असताना प्रशासनाचे याकडे लक्ष का जात नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

    पाण्याची बचत करण्याची जबाबदारी केवळ नागरिकांचीच आहे का? सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती रोखण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

     संबंधित विभागाने कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी आणि रस्त्यावरील चिखल दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भोसले वस्ती परिसरातील नागरिकांनी केली आहे.