“शरद पवार सुप्रिया सुळे भाजपाचा विभाजनवादी अजेंडा पुढे नेतात” - अंजली आंबेडकर

“शरद पवार सुप्रिया सुळे भाजपाचा विभाजनवादी अजेंडा पुढे नेतात” - अंजली आंबेडकर

 

मुंबई : शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपाच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात, पण त्यांना भाजपाची बी टीम म्हटलं जात नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी पोस्ट करत हा सवाल उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर निर्भय बनोच्या किती लोकांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

काय आहे अंजली आंबेडकर यांची पोस्ट?

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या अलीकडील निर्णयावर टीका करणारे खुले पत्र किती स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी लिहिले? निर्भय बनोच्या किती लोकांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची बी-टीम म्हटले?

वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला भाजपची बी-टीम ठरवण्यासाठी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोचे लोक नेहमीच तत्पर असतात. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात, तेव्हा अचानक त्यांचे आवाज बंद होतात.

२०२४ च्या निवडणुकीत प्रबळ जातींच्या राजकीय पक्षांसाठी या उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोच्या लोकांनी जोरदार प्रचार केला, त्या पक्षांना प्रश्न विचारण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते जाणीवपूर्वक गप्प बसतात. हा बौद्धिक विसंगतीचा प्रश्न नाही, तर राजकीय सोय आणि जातीवर आधारित ‘निवडक संताप’ दाखवणारी कृती आहे. यांच्या राजकीय नैतिकतेत एक विचित्र दुटप्पीपणा दिसून येतो. बहुजनांच्या राजकीय अस्मितेवर आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वावर ते सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र, ज्या सवर्ण राजकीय पक्षांच्या कृती भाजपाचा सामाजिक आणि राजकीय अजेंडा अधिक मजबूत करत आहेत, त्यांच्याबाबत मात्र कमालीची उदार भूमिका घेतात.

डिलिमिटेशन विधेयक एसआयआर पेक्षा घातक-अंजली आंबेडकर

भाजपाने प्रस्तावित केलेले डिलिमिटेशन विधेयकाला हे SIR पेक्षाही अधिक धोकादायक आहे. या डिलिमिटेशन विधेयकामुळे उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व असमान प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या संघराज्यीय समतोलाला मूलभूत धक्का बसू शकतो. एका विशिष्ट प्रादेशिक गटाच्या हातात राजकीय सत्ता केंद्रित होऊ शकते आणि संघराज्य व्यवस्थेतील समान प्रतिनिधित्वाच्या लोकशाही तत्त्वाला बाधा पोहोचू शकते. हा काही केवळ संसदेतील तांत्रिक प्रक्रियेचा विषय नाही. हा भारताच्या लोकशाहीच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेणाऱ्या आणि भारताच्या लोकशाही व संघराज्यीय पायाभूत रचनेला कमकुवत करणाऱ्या राजकीय प्रक्रियेला मदत करत आहेत, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. मात्र, प्रश्न असा आहे की, उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोच्या लोकांनी मौन का बाळगले आहे?

वंचितला भाजपाची बी टीम ठरवलं जात पण…

वंचित बहुजन आघाडी केवळ स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून ती आपोआप भाजपची बी-टीम ठरते; मग शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या राजकीय अजेंड्याला मदत करतात आणि त्याला वैधता मिळवून देतात, तेव्हा त्यांना भाजपची बी-टीम का म्हटले जात नाही?

तुमचे हे मौन तुमचा संताप हा केवळ राजकीय सोय आणि जातीवर आधारित आहे. यातून तुमचा बौद्धिक अप्रामाणिकपणा आणि बहुजन राजकीय पक्षांविषयी असलेला द्वेष उघड होतो. तुम्ही सर्वजण विकले गेलेले आहात असे भाजपाला पोट तिडीकेने विरोध करणाऱ्या फुले आंबेडकरी कार्यकर्त्यांनी गृहीत धरावे का?