जर तेच जुने सरकार अन् तीच जुनी मानसिकता असती, तर पुण्यात...; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६
Edit
पुणे : पुणे मेट्रोचे लोकार्पण आणि त्याचा विस्तार हे दर्शवते की, 'विकसित भारता'साठी आम्ही कशी शहरे तयार करत आहोत. पूर्वी एखाद्या शहराची ओळख त्याच्या उद्योगांवरून, तेथील प्रसिद्ध खानपानावरून अथवा फळ-पिकांवरून होत होती. मात्र, आज शहरांच्या ओळखीसोबत आणखी दोन निकष जोडले गेले आहेत, एक म्हणजे, एखादे शहर किती कंपिटिटिव्ह आहे? आणि दुसरा म्हणजे, तेथे 'ईज ऑफ लिविंग'चा स्तर काय आहे? मेट्रो प्रकल्प या दोन्ही कसोट्यांवर कोणत्याही शहराला अधिक चांगले बनतो. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटेल आहे. एढेच नाही तर, "जुनी मानसिकता आणि जुनेच सरकार असते, तर पुण्यात मेट्रो पोहोचायला आणखी काही दशके लागली असती," असे म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांना टेलाही लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने जवळपास २१८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.
मोदी म्हणाले, "पुणे मेट्रोच्या होत असलेल्या विस्तारामुळे प्रवाशांचा वेळही वाचत आहे आणि पुणेकरांना अधिक सुविधादेखील मिळत आहेत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, जेव्हा शहराचा वेळ वाचतो, तेव्हा शहराची उत्पादकता वाढते आणि जेव्हा शहराची उत्पादकता वाढते, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते आणि जेव्हा अर्थव्यवस्था वाढते, तेव्हा गरीब आणि मध्मयवर्ग, या दोघांनाही त्याचा फायदा होतो."
"जुने सरकार असते आणि जुनी कार्यसंस्कृती असती, तर..." -
"बंधूंनो, आजचा हा दिवस 'प्रो-पीपल, प्रो-एक्टिव्ह आणि गुड गव्हर्नन्स'चेही उदाहरण आहे. आपल्या देशात पहिली मेट्रो ही १९८४ मध्ये धावली होती. त्यानंतरच्या ३० वर्षांत केवळ २४८ किलोमीटर मेट्रो लाईन तयार झाली. महत्वाचे म्हमजे, देशात २०१४ पर्यंत देशात केवळ पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती. जर तीच जुनी मानसिकता कायम असती, जुने सरकार असते आणि जुनी कार्यसंस्कृती असती, तर पुण्यात मेट्रो पोहोचायला आणखी काही दशके लागली असती," असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.
२०१४ मध्ये जेथे केवळ ५ शहरांमध्ये मेट्रो धावत होती -
मोदी म्हणाले, "२०१४ मध्ये जेव्हा देशाने एनडीएला सेवेची संधी दिली, तेव्हा आम्ही एका संकल्पाने पुढे चालतलो. तो संकल्प म्हणजे, शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या 'ईज ऑफ लिविंग'चा आणि 'ईज ऑफ ट्रान्सपोर्टेशन'चा होता आणि त्याचा परिणाम आज आपण बघत आहोत. गेल्या १२ वर्षांत देशातील मेट्रो ट्रान्सपोर्टचा कायकल्प झाला आहे. जेथे १०१४ मध्ये २४८ किलोमीटर मेट्रो रुट होता, तो आता वाढून सुमारे १२०० किलोमीटर झाला आहे. २०१४ मध्ये जेथे केवळ ५ शहरांमध्ये मेट्रो धावत होती, तेथे आज देशाच्या २६ शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. आता रोज मेट्रोमध्ये १ कोटींहून अधिक लोक प्रवास करत आहेत. आज भारतीय मेट्रो नेटवर्क जगातील टॉप-३ मेट्रो नेटवर्कमध्ये गणले जाते."
महाराष्ट्रातील मेट्रो विस्ताराची माहिती देताना मोदी म्हणाले, "देशातील इतर भागांसारखीच परिस्थिती महाराष्ट्रातही होती. जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा एनडीएचे 'डबल इंजन' सरकार आले, तेव्हा महाराष्ट्रात अवघ्या १०-११ किलोमीटर मेट्रो लाईन सुरू होती. आज महाराष्ट्रात सुमारे पावणे दोनशे किलोमीटर मेट्रो लाईन सेवेत आहे. ६८० किलोमीटरच्या मेट्रो लाईन्सचे काम सुरू आहे."
"आज केवळ मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चरवरच महाराष्ट्रात अडीच लाख कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली जात आहे. हा पैसा मजुरांच्या खिशात जात आहे. हा पैसा इंजिनियरना रोजगार देत आहे. हा पैसा दुकानांमध्ये आणि कारखान्यांमध्ये रोजगार निर्मिती करत आहे," असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.