शरद पवारांच्या निवृत्तीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
मुंबई : शरद पवार यांना चांगले आरोग्य लाभावे, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. ते आजही सक्रीय आहेत. सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये, कामांमध्ये ते रुची घेत असतात. शरद पवार आपल्या आयुष्यात कधीही थांबणार नाहीत, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार आहेत. १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असतो, त्या दिवशी याबाबत घोषणा केली जाणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, एकच सांगतो की, शरद पवार यांना उत्तम आरोग्य लाभावे, ही आमची सर्वांची इच्छा आहे. शरद पवार आजही सक्रीय आहेत.
शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नाही
मी जवळून शरद पवार यांचे व्यक्तिमत्व पाहिले आहे. शरद पवार हे सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये, कामांमध्ये रुची घेत असतात. त्यामुळे शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नाही. ते आपल्या आयुष्यात कधीही थांबणार नाहीत, असा मला विश्वास आहे. काही ना काही ते सकारात्मक करतच राहतील. त्यामुळे या ज्या काही चर्चा सुरू आहेत, तशा चर्चा करण्याचे कारण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करावी व त्यांच्या पक्षाने भाजपप्रणित ‘एनडीए’त सहभागी व्हावे यावर त्यांच्या पक्षात मंथन सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. शरद पवार यांचा पक्ष ‘एनडीए’सोबत जाण्याची दाट शक्यता असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. या संबंधीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात अधिकच उधाण आले असताना आता शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शरद पवारांच्या निवृत्तीबाबत नेमकी काय चर्चा?
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती करावी व त्यांच्या जाहीर पक्षाने भाजपप्रणित 'एनडीए'त सहभागी व्हावे यावर त्यांच्या पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. शरद पवार हे 12 डिसेंबर रोजी 86 वर्षांचे होत आहेत. सहा दशकांहून अधिक काळ ते राजकारणात आहेत. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदापासून अनेक पदे त्यांनी भूषविली. वयाच्या या टप्प्यावर भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्यास आतापर्यंतच्या भूमिकेला तो मोठा छेद असेल. हे टाळायचे तर त्यांनी निवृत्ती घ्यावी व त्यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आदींनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा अशा शक्यतेची चाचपणी केली जात आहे. नेमका निर्णय काय घ्यायचा हे अद्याप ठरलेले नाही. भाजपच्या नेतृत्वाशीही पक्षाच्या काही नेत्यांनी या संदर्भात चर्चा केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचंही वृत्तसंस्थेने लिहलं आहे. 'आपण विश्रांती घ्या सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी शरद पवार यांना फोनवर म्हटले होते. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोदी यांनी हा फोन केला होता. पवार यांच्या निवृत्तीचे स्वतः पंतप्रधानांनी संकेत दिले, असा त्याचा अर्थ काढला गेला होता.