मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
महायुतीत मतभेद नाहीत : फडणवीस
महायुतीत कुठलेही
मतभेद नसून कुणाच्याही मनात कुठलाही संभ्रम नाही, असे फडणवीस यांनी
नागपुरात स्पष्ट केले. युतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत. एकनाथ शिंदे, अजित पवार व आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. सर्व निर्णय सोबत बसून होतील, असे आम्ही निवडणुकीच्या अगोदरच सांगितले होते.
आमचे
पक्षश्रेष्ठी सोबत बसून निर्णय घेतील. कुणाच्याही मनात किंतु परंतु नाही व
एकनाथ शिंदे यांनी उघड भूमिका मांडून राजकीय क्षेत्रातील काही लोकांच्या
मनातील सर्व संभ्रम दूर केले आहेत, असे फडणवीस म्हणाले. कार्यकर्त्यांची
इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे याबाबत विचारणा
केली असता फडणवीस यांनी काहीही न बोलता केवळ हात जोडले.
सोबत बसून सगळे निर्णय होणार आहेत. कोणाच्या मनात काही किंतु परंतु असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे. पक्षश्रेष्ठींसोबत आमची बैठक होईल आणि तिथे पुढचे निर्णय होतील. महायुतीमध्ये आम्ही एकत्रित बसूनच निर्णय केले आहेत, तसेच पुढचे निर्णय होतील. - देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री.
भाजप मुख्यमंत्रिपदासाठी जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराला माझा किंबहुना शिवसेना म्हणून आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही फोनवरून संवाद साधून त्यांना हे कळवले आहे. सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण किंवा नाराजीही नाही. - एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री
आज मी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर आमची पुढची चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री व एक मुख्यमंत्री असे सरकार स्थापन होईल. - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री
शिंदे नाराज असल्याच्या वावड्या विरोधक उठवत होते, पण शिंदे यांनी त्यावर आज सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ते एक कणखर नेते असून त्यांच्यामुळे महायुती मजबूत आहे. शिंदे यांनी मांडलेली भूमिका कौतुकास्पद आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप.