मुंबईतील महायुतीची बैठक रद्द, एकनाथ शिंदे गावाकडे रवाना

मुंबईतील महायुतीची बैठक रद्द, एकनाथ शिंदे गावाकडे रवाना

 


सातारा : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सहा दिवस झाले आहेत. पण महाराष्ट्रात सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिमंडळाची कधी होणार घोषणा? याची महाराष्ट्र वाट पाहतोय. त्यातच आजची मुंबईत होणारी महायुतीची बैठक रद्द झाली आहे. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा या आपल्या गावी जाणार असल्याची माहिती मिळतेय.

महायुती सरकार स्थापनेबाबत आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत गेल्या दोन-तीन दिवसांपासून बैठका सुरु आहेत. कालच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यानतंर आज सकाळी मुंबईत महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण ती अचानक रद्द करण्यात आली. आता ही बैठक दोन दिवसांनी पार पडणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी या काळात सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी भेट देण्याचं नियोजन केलं आहे. निवडणुकीसाठी आपल्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर नैतिक पाठिंबा दिल्यानं ते इथल्या जनतेचे प्रत्यक्ष गावाला भेट देऊन आभार मानणार आहेत, असं सांगितलं जात आहे. पण त्याचबरोबर दुसरीकडं सरकार स्थापन होत असताना ते नाराज असल्याच्या चर्चा देखील होत आहेत. पण याचमुळं आजची मुंबईतील बैठक पुढे ढकलण्यात आली काय? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित मानलं जात आहे. पण अद्याप भाजपनं असे कुठलेही संकेत दिलेले नाहीत किंवा घोषणाही केलेली नाही. त्यामुळं फडणवीसांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार की भाजप काही सरप्राईज इलेमेंट अवलंबतोय याची चर्चा मात्र आता सुरु झाली आहे.