
बारामती न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; दौंड खून प्रकरणात 12 जणांना जन्मठेप
बारामती:– दौंड येथील बहुचर्चित खून प्रकरणात बारामती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत 12 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामध्ये चार सख्ख्या भावांसह तीन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणात पती-पत्नी गणपती दर्शनावरून परतताना पतीची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
3 मे 2018 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दौंड येथील पासलकर वस्ती, दौंड कोर्टाजवळ ही घटना घडली. विनोद नरवाल आणि त्यांची पत्नी मीना नरवाल हे दुचाकीवरून गणपती दर्शन करून घरी परतत असताना 12 आरोपींनी त्यांना आडवले.
यामध्ये संजीत जयप्रकाश टाक, सुजीत जयप्रकाश टाक, रवि जयप्रकाश टाक, रणजित जयप्रकाश टाक, आकाश उर्फ छोटू दिपक बेहोत, नरेश प्रकाश वाल्मिकी, बबलू हिरालाल सरयान, सुरेश हिरालाल शरवान, ममता संजीत टाक, माधुरी सुजित टाक, शोभा किशोर वाल्मिकी आणि विकी नरेश वाल्मिकी यांचा समावेश आहे. त्यांनी तलवार, कोयता, लोखंडी पाईप, काठ्या, फरशीचे तुकडे आणि दगडांनी विनोद नरवाल यांच्यावर हल्ला केला. मीना नरवाल यांनी पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्यक्षदर्शी उषा बडमारे यांनाही मारहाण झाली. उपचारासाठी पुण्याला नेत असताना विनोद यांचा वाटेत मृत्यू झाला.
या प्रकरणी मीना नरवाल यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (भा.द.वि.) कलम 302, 341, 506, 143, 148 आणि 27 अन्वये तक्रार दाखल केली. दौंड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी तपास पूर्ण करून बारामती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांच्यासमोर खटला चालला. सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी 8 साक्षीदारांचे पुरावे आणि युक्तिवादाद्वारे सर्व आरोपींवर दोष सिद्ध केले.
न्यायालयाने 12 आरोपींना खुनाच्या आरोपाखाली (भा.द.वि. कलम 302) जन्मठेप आणि प्रत्येकी 25,000 रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने कैद; तसेच इतर कलमांन्वये सक्तमजुरी आणि दंडाच्या शिक्षेची सजा ठोठावली. सर्व आरोपींनी एकूण 5 लाख 4 हजार रुपये दंड जमा केल्यास ही रक्कम मीना नरवाल यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
या खटल्यात सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना सहायक सरकारी वकील डी. एस. शिंगाडे, फिर्यादीचे वकील अॅड. मंगेश देशमुख, कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव नलवडे, जी. के. कस्पटे आणि दौंड पोलीस स्टेशनच्या म. पो. ह. मनिषा अहिवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.