सांगवीत यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्राला महिलांची रेकॉर्ड ब्रेक तोबागर्दी
बारामती:- यंदा पाऊस पाणी, पिके चांगली झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक समाधानी असून सध्या गावोगावच्या यात्रांनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत.बारामती तालुक्यातील सांगवी येथील श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त शुक्रवारी दि.२५ चे रात्री खास महिलांसाठी ऑर्केस्ट्राचे करण्यात आले होते.या कार्यक्रमाला महिलांच्या रेकॉर्ड ब्रेक तोबा गर्दी समोर विविध प्रकारे अदाकारी सादर करणाऱ्या कलाकारांनी अक्षरशः धुमाकूळ घालत रसिक प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली.
सांगवी येथील यात्रेनिमित्त अनिल जाधव निर्मित धुमाकूळ या डिजिटल ऑर्केस्ट्राचेआयोजन करण्यात आले होते.या गावात गेल्या कांही वर्षांपासून देवांच्या हळदीच्या दिवशी खास महिलां साठी स्वतंत्र ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता.येथील यात्राकमिटीने योग्य नियोजन करून व्यासपीठा समोर खास महिलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला होता.महिलांसाठीसुरक्षित,सोईची जागा करून दिल्यामुळे सांगवी परिसरातील सुमारे अडीच हजार महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
मराठमोळ्या लज्जतदार लावण्यांपासून हिंदी-मराठी चित्रपट गीतांसह नृत्य,गीत संगीताने नटलेल्या सुंदर नृत्यांगनांनी बहारदार मनोरंजन केले.त्यासोबत घरात व समाजात दररोजच्या घडणाऱ्या प्रसंगाचे संवाद व हातवारे करत हास्याचे फवारे उडवून दिले. कार्यक्रमातील सुरभी,सुमन व करिष्मा या नृत्यांगनांनी आपल्या अदाकारीने अक्षरशः धुमाकूळ घातला.
दरम्यान यात्रा कमिटीने योग्य प्रकारे केलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाचे कलाकारांसह महिलांनी मनापासून आनंद व समाधान व्यक्त केले. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने निर्माते अनिल जाधव यांना सन्मानित करण्यात आले आहे.
