
छत्रपती साखर कारखाना निवडणूक; इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली
बारामती:- भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी साठी इच्छुक उमेदवारांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखती घेतल्यानंतर आता इच्छुकांची धाकधुक चांगलीच वाढली आहे.
छत्रपती साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी (दि.२४ रोजी) सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे,समन्वयक किरण गुजर आदी उपस्थित होते. जाचक यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनेल उभे करण्यात येत असल्या मुळे मुलाखतीसाठी देखील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार उपस्थित होते. सर्वपक्षीय पॅनेल करून कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जाचक प्रयत्न करीत आहेत. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत अजित पवारयांनीदेखील दिले आहेत.
मुलाखती झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी आपलेश्री छत्रपती साखर कारखाना निवडणूक माघारीचे अर्ज दिले आहेत. आता पॅनेल जाहीर करण्याची वेळ जवळ आल्यामुळे अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काही इच्छुकांनी तर अभी नही तो कभी नही, अशी भूमिका घेत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. सर्वपक्षीय पॅनेलमध्ये कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही या शक्यतेने अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
छत्रपती कारखान्याचे निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ४३१ अर्ज दाखल झाले आहेत. यातील किती उमेदवार अर्ज माघारी घेतात याकडे आतां कारखाना कार्यक्षेत्रातील वर्तुळाचे लक्ष लागले आहे.