माळेगाव निवडणूकीत नेत्यांबरोबर युवकांचेही उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन

माळेगाव निवडणूकीत नेत्यांबरोबर युवकांचेही उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन

 

माळेगाव - माळेगाव (ता. बारामती) कारखाना निवडणूकीत मातंबर नेते मंडळींबरोबर आज युवा नेते योगेश जगताप आदींनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. व बारामती निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यमान अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा योगिता कोकरे, कार्यकर्ते प्रशांत सातव, अनिल तावरे, संग्रामसिंह देवकाते आदींनी उमेदवारी जाहीर करीत अर्ज दाखल केले.

पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे आदींनीही या निवडणूकीत दंड थोपटलेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या इच्छुकांनीही अर्ज दाखल करीत निवडणूकीत चुरस वाढली.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पन्नास पेक्षा अधिक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज ऐनवेळी दाखल केले.

पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे, कष्ठकरी शेतकरी संघटनेनेही या निवडणूकीत दंड थोपटत तुल्यबळ उमेदवारांचे अर्ज दाखल केले. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हे राजकीय चित्र स्पष्ट झाले.

'सहा गटातून पुरेसे अर्ज आल्याने आम्हीसुद्धा सत्ताधाऱ्यांना पर्याय होऊ शकतो,' असा विश्वास शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश खोमणे यांनी व्यक्त केला. या प्राप्त स्थितीचा विचार करता `माळेगाव`वर प्रभाव कोणाचा दिसतो, हा खरा उत्सुकतेचा विषय झाला आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष अॅड.केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे सत्ताधारी संचालक मंडळ पाच वर्षांपासून माळेगाव कारखान्यावर कार्य़रत राहिले. दरम्यानच्या कालावधीत पवारसाहेब आणि अजित पवार यांचे स्वतंत्र पक्ष कार्यरत झाले. त्यानुसार गाव पातळीवर, तसेच सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन गट पडले.

त्याचा परिणाम आता माळेगावच्या निवडणूकीतही दिसू लागला आहे. 'आमचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही या कारखान्याच्या निवडणूकीत भाग घेण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत. त्यामुळे निवडणूकीत तडजोड करायची की लढायचे हे सर्वस्वी युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे ठरविणार आहेत,' असे मत सतिश खोमणे, एस.एन.जगताप आदींनी व्यक्त केले.

योगेश जगताप यांचे शक्ती प्रदर्शन..!

राष्टवादी काँग्रेस पक्षाचा सक्षम पॅनेल तयार करण्यासाठी श्रेष्टींनी आजवर केलेल्या तयारीचा आढावा अजित पवार यांनी सोमवार (ता. २६) रोजी घेतला. कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तिची मते खेचून आणणाऱ्या काही जुन्या चेहऱ्यांसह अधिकाधिक नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पवार आग्रही आहेत.

अजितदांदांनी स्थानिक युवा कार्यकर्ते व नेत्यांना संधी देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे आम्ही इच्छुक उमेदवार स्वागत करतो. त्यामुळे माझा उमेदवारी अर्ज दाखल करताना सभासदांनी काढलेली फोरव्हिलर रॅली लक्षवेधी ठरली, असे मत युवा नेते योगेश जगताप यांनी व्यक्त केले.