एलपीजी सिलिंडर स्वस्त; नवीन दर जाहीर
बारामती:- मे महिन्याच्या पहिल्या तारखेला कंपन्यांनी एलपीजीचे दर जाहीर केले आहेत. घरगुती वापराच्या गॅसचे दर कमी झालेले नसले तरी व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले आहेत. १९ किलोंच्या गॅस सिलिंडरच्या दरामंमध्ये १७ रुपयांची कपात झालेली आहे. नवीन दरांमुळे सिलिंडरची किंमत १७४७.५० इतकी झाली आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर ८ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेले होते. त्यात वर्षभरानंतर ५० रुपयांची वाढ करण्यात आलेली होती.
कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर एप्रिल महिन्यात १ हजार ७६२ रुपये होते. तर मार्च महिन्यामध्ये हेच दर १ हजार ८०३ रुपये इतके होते. तेल कंपन्यांनी १ मे रोजी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार व्यावसायिक सिलिंडर १ हजार ७४७.५० इतक्या रुपयांना खरेदी करावे लागणार आहे.
१९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १४.५ रुपयांनी कमी झाली आहे. दोन महिन्यांतील दरांचा अंदाज घेतल्यास याच कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर ५५.५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. घरगुती गॅसचे दर वाढवून व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर १५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. ब्रेंट क्रूडचे प्रति बॅरलचे दर ६३ डॉलरच्या आसपास आहेत. सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे प्रत्येकी दोन रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोलवर आता १३ रुपयांचे तर डिझेलवर १० रुपयांचे उत्पादन शुल्क आकारले जाईल. वाढीव शुल्काचा फटका ग्राहकांना बसणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. तेल कंपन्यांकडून गत १५ मार्चपासून पेट्रोल—डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.